लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या बाेटीने यापूर्वी आठ वेळा दुबई व अन्य आखाती देशात प्रवास केल्याचे तपासात पुढे आले आहे. ही बाेट सीमाशुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी (२१ एप्रिल) मध्यरात्री मंडणगडातील बाणकोटच्या सागरी हद्दीमध्ये पकडली होती. या नौकेचे कागदपत्रही बनावट असल्याचा संशय आहे. या बाेटीवरील १६ खलाशांपैकी काहींची ओळख पटली असली, तरी यांच्या मोरक्याचा अद्याप ठावठिकाणा लागला नसल्याची माहिती सीमा शुल्कच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ही बोट प्रवास करताना १०७ नॉटिकल मैल अंतर इतक्या आत समुद्रातून जात होती. रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी सुरक्षा हद्दीबाहेरून काही नॉटिकल मैल प्रवास केला. त्यामुळे सिंधुदुर्गमधून निघालेल्या या बोटीचा सीमाशुल्क विभाग व सुरक्षा यंत्रणांनी तब्बल पाच तास शोध घेऊनही ती सापडली नव्हती. ही नौका योजनाबद्ध कट करूनच सागरी हद्दीबाहेरून गेली असावी, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
७५ नॉटिकल मैल अंतरावर बाणकोटनजीक ही नौका पकडण्यात आली होती. तांडेल व्यतिरिक्त अन्य एकाही खलाशाला हिंदी किंवा अन्य भाषा समजत नसल्याचे पुढे आले आहे.