चिपळूण : वाशिष्ठी नदीत अंघोळीसाठी पाण्यात उतरलेल्या आणि रविवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेल्या अब्दुल कादीर नोशाद लासने आणि आतिर इरफान बेबल या दोन्ही मुलांचे मृतदेह तब्बल २४ तासांनी हाती लागले. तटरक्षक दलाच्या पाणबुड्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत हे मृतदेह तळाशी खडकात अडकलेले आढळले.शहरालगतच्या मिरजोळीलगतच्या एका हायस्कूलमधील दहावीच्या वर्गात शिकणारे आठ विद्यार्थी कुंभार्ली गणेशवाडी येथील वजहर या ठिकाणी वाशिष्ठी नदीपात्रातील डोहात अंघोळीसाठी गेले. काही वेळातच जोरदार पाऊस सुरू होताच सहा जण तातडीने पात्राबाहेर येऊन कातळावर उभे राहिले. मात्र, लासने आणि बेबल हे दोघेही डोहातच होते. पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला. डोहातील भोवऱ्यात आतिक (बेबल मोहल्ला, चिपळूण) व अब्दुल कादीर नोशाद लासने (रा. जिव्हाळा सुपर बाझार शेजारी, चिपळूण) हे दोघेही सापडले व काही क्षणात ते दोघेही गायब झाले.रविवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून सोमवारी सायंकाळी सहापर्यंत या दोघांचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्न केले. काही जाणकारांच्या मदतीने हूक टाकून व त्यानंतर बांबूच्या सहाय्याने शोध घेण्यात आला. याशिवाय एका धाडसी तरुणाने डोहात उतरून त्या दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काहीच हाती लागले नाही.महाड येथील एसआरटी पथकाचा प्रयत्नही असफल ठरला. अखेर तटरक्षक दलाचे पथक मागवून दोन पाणबुडे डोहात उतरले. डोहात चार तास शोध मोहीम राबवल्यानंतर त्यांना एकाचा मृतदेह सापडला. त्याआधी घटनास्थळापासून काही अंतरावर वाशिष्ठी नदीपात्रात अब्दुल कादीर नोशाद लासने याचा मृतदेह सापडला.या शोध मोहिमेसाठी प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे व पोलिस घटनास्थळी तळ ठोकून आहेत. सोमवारी दुपारी आमदार भास्कर जाधव यांच्यासह काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष लियाकत शाह, सामाजिक कार्यकर्ते नाजिम अफवारे यांच्यासह मुस्लीम समाजबांधव मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित होते.
डोहातील पाणी पातळी कमी केलीकुंभार्ली येथील डोहाकडे जाणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाशिष्ठी नदीच्या दुसऱ्या बाजूने वळविण्यात आला. त्यासाठी दोन पोकलेनच्या सहाय्याने नदीपात्रात बंधारा घालून पाणी दुसऱ्या बाजूने वळविण्यात आले. सोमवारी सकाळपासून ही प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे डोहाच्या ठिकाणी असलेला पाण्याचा प्रवाह बहुतांशी कमी झाला. त्यामुळे शोध कार्यास काहीसा वेग आला.एकूण १५ मुलांचा होता ‘प्लॅन’?दहावीच्या वर्गातील १५ मुले एकत्रित कुंभार्ली येथे दुचाकीने जाण्याचा प्लॅन होता. त्याप्रमाणे सायंकाळी खासगी क्लास लवकरच आटोपून फुटबॉल खेळायला जातो, असे घरच्यांना सांगून काही जण घराबाहेर पडले. परंतु काहींना दुचाकी उपलब्ध न झाल्याने अखेर आठ जण तीन दुचाकीने घटनास्थळी पोहोचले होते. या घटनेचा उर्वरित विद्यार्थ्यांनी मोठा धसका घेतला असल्याचे समजते.