चिपळूण : शहरातील पेठमाप एन्रॉन बायपास पुलाखाली गोवळकोट येथील एका तरुणाचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आज (गुरुवारी) सकाळी आढळून आला. तो मनोरुग्ण असल्यामुळे त्याने स्वत:ला दुखापत केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू ओढवला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आत्महत्या की घातपात अशी चर्चा चिपळूण शहरात सुरु असून याबाबत चिपळूण पोलीस तपास करीत आहेत. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर तपासाला गती येणार आहे.पांडुरंग संजय शिंदे (२२, रा. गोवळकोट धक्का, भोईवाडी) या तरुणाचा मृतदेह एन्रॉन बायपास पुलाखाली आढळून आला. गेले चार महिने हा तरुण घराच्या बाहेर पडला नव्हता. मात्र बुधवारी सकाळी त्याच्या भावाबरोबर तो बाहेर पडला. त्यानंतर दोघेही दुपारी घरी आले. त्यानंतर तो एकटाच घरातून बाहेर पडला.
सायंकाळी उशीरापर्यंत घरी आला नाही म्हणून घरातील लोकांनी त्याची शोधाशोध सुरु केली. शोध करत असताना त्याच्या वडिलांना आज सकाळी ८.३० वाजता पेठमाप एन्रॉन पुलाखाली त्याचा मृतदेह निदर्शनास आला. त्याच्या मानेवर व कमरेवर वार दिसून येत होते.
त्यामुळे सुरुवातीला आत्महत्या की घातपात अशी चर्चा चिपळूण शहरात सुरु होती. ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्या परिसरात गर्दी केली होती. याबाबतची फिर्याद साईराज संजय शिंदे (रा. गोवळकोट भोईवाडी) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात दिली.याबाबतची खबर चिपळूण पोलिसांना मिळाल्यानंतर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शितल जानवे, पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे, डी. व्ही. विभूते, विनोद आंबेरकर, पोलीस उपनिरीक्षक मुरलीधर नाटेकर, पी. एल. चव्हाण, मनिष कांबळे, जितेंद्र घाणेकर आदींनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
पोलिसांनी आजूबाजूचा परिसराचीही पाहणी केली. तरुणाच्या तपासासाठी रत्नागिरीहून ठसेतज्ञ, फॉरेन्सिक इन्व्हेस्टीगेशन व श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. मृतदेहाच्या ठिकाणी फुटलेली काचेची बाटली आढळून आली.
आज सायंकाळी उशीरा शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आजी, आजोबा, आई, वडिल, बहिण, भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी आकस्मिक मृत्यू म्हणून चिपळूण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बडेसाहेब नायकवडे करीत आहेत.