रत्नागिरी : येथील बोडस चॅरिटेबल ट्रस्टचे कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव पुरस्कार जाहीर झाले असून कासारकोळवण (तालुका संगमेश्वर) येथील सुभाष मांगले, विश्वास मांगले, धामणसे (ता. रत्नागिरी) येथील अशोक पांचाळ, गोळप येथील शैला लिमये आणि मालवण तालुक्यातील चिंदरबाजार येथील सुरेश तोडकर हे या पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.
बोडस चॅरिटेबल ट्रस्टतर्फे दरवर्षी पुरस्कार जाहीर करण्यात येतात. सन २०२०-२१ या वर्षातीलही कर्तव्यनिष्ठा आणि कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यात ३ तालुक्यातील ५ जणांचा समावेश आहे. कर्तव्यनिष्ठा पुरस्कारासाठी कासारकोळवण (तालुका संगमेश्वर) येथील सुभाष मांगले आणि विश्वास मांगले यांची निवड करण्यात आली आहे.
कार्यगौरव पुरस्कारप्राप्त व्यक्तींमध्ये धामणसे (ता. रत्नागिरी) या गावातील कारागीर अशोक एकनाथ पांचाळ आणि फिनोलेक्स फाटा येथील ७० वर्षीय व्यावसायिक शैला सिध्देश्वर लिमये, तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिंदर बाजार (तालुका मालवण) येथील काचेचे दिवाबत्ती कारागीर सुरेश तोडकर यांचा समावेश आहे.
सर्व पुरस्कार विजेत्यांना त्यांच्या निवासस्थानी हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील किंवा रजिस्टर पोस्टाने पोहोचवले जातील, असे ट्रस्टच्यावतीने विश्वस्त यशराज बोडस यांनी कळविले आहे.