गुहागर : संगमेश्वर येथील शास्त्री पुलावरून ट्रक नदीत कोसळून झालेल्या अपघातामधील बेपत्ता ट्रक चालक तब्बल ९ दिवसाने तवसाळच्या जयगड खाडीत मृतावस्थेत मिळून आला आहे. त्याच्या पँटच्या खिशामध्ये सापडलेल्या पॉकीटमधील वाहन चालक परवान्यावरून त्याची ओळख पटली आहे.बसवराज भिमाप्पा छुरी (३०, रा. हलगती, ता. रामदुर्ग) असे मृतावस्थेत मिळून आलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. संगमेश्वर येथील शास्त्री पुलावर १६ जुलै रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला होता.
सिमेंट गोणी घेऊन जाणाऱ्या ट्रक चालकाला शास्त्रीपुलावरील वळणाचा अंदाज न आल्याने १६ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमाराला हा अपघात घडला होता. या अपघामध्ये ट्रकचालक बसवराज भिमाप्पा छुरी हा बेपत्ता झाला होता. गुरूवारी सकाळी ११ वाजता तवसाळ येथील काही ग्रामस्थांना तवसाळच्या जयगड खाडीमध्ये फेरीबोट धक्क्यासमोर अनोळखी मृतदेह आढळून आला होता.गुहागर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आनंदराव पवार हे घटनास्थळी दाखल झाले. खाडीतील मृतदेह बाहेर काढून त्याच्या पँटच्या खिशामध्ये पैशाचे पॉकेट सापडले. त्यामध्ये पैशाबरोबर वाहन चालक परवाना सापडल्यामुळे त्याची ओळख पटली आहे.
गुहागर पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. शास्त्रीपुलाची नदी डिंगणीमार्गे भातगाव खाडी करत जयगड खाडीतून समुद्राला मिळते. त्यामुळे हा मृतदेह याठिकाणी आढळून आला.