लांजा : तालुक्यातील रुण येथील पराडकरांचा डोंगर येथील जंगलमय भागात ५० ते ५५ वर्षीय अज्ञात पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. दरम्यान, शवविच्छेदनासाठी लांजा तालुक्यातील डॉक्टर उपलब्ध न झाल्याने जाकादेवी (ता. रत्नागिरी) येथील डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते.
रुण येथील महिला आपल्या बकऱ्या चरण्यासाठी घेऊन सोमवारी सायंकाळी पराडकरांचा डोंगर या ठिकाणी गेली होती. या भागात दुर्गंधी येत असल्याची माहिती तिने वाडीतील ग्रामस्थांना दिली. त्यानुसारच लांजा पोलीस यांना माहिती देण्यात आली होती. लांजा पोलीस स्थानकांचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर, सहायक पोलीस उपनिरीक्षक सुनील चवेकर, हेडकाॅन्टेबल अरविंद कांबळे, राजेंद्र कांबळे, प्रथमेश वारिक आदींनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला. मात्र, अंधार असल्याने शोध माेहीम थांबवण्यात आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी शोध पथकाने सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा शाेध माेहीम सुरू केली. त्यानंतर मानवी पुरुष जातीचा मृतदेह दिसला.
मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याचे शवविच्छेदन घटनास्थळी करण्याशिवाय पर्याय नसल्याने डॉक्टरांशी संपर्क साधण्यात आला. मात्र तालुक्यात डॉक्टर उपलब्ध न झाल्याने अखेर तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली. त्यानुसार जाकादेवी येथील डॉक्टर उपलब्ध करून त्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. लांजा शहरामध्ये ५० ते ५५ वर्षीय वेडसर व्यक्ती गेली अनेक दिवस फिरत होती. त्याचाच हा मृतदेह असावा, असा अंदाज पाेलिसांनी वर्तविला आहे. मात्र, या व्यक्तीचे नाव, पत्ता माहीत नसल्याने त्याची ओळख पटविण्याचे काम पाेलीस करत आहेत.