मंडणगड : तालुक्यातील वेळास व साखरी दरम्यान समुद्रकिनारी कचऱ्यासोबत एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह वाहून आल्याची घटना दि. २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. या घटनेची माहिती मिळताच बाणकोट सागरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उत्तम पिठे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करत पंचनामा केला आहे. तसेच मृतदेह ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी मंडणगड येथे आणण्यात आला आहे.
समुद्रकिनारी साधारण ४ ते ५ किलाेमीटर चालत जीवरक्षकांसाेबत पोलीस घटनास्थळी गेले. या मृतदेहाच्या अंगावर एकही कपडा नव्हता तर शरीर पाण्यात फुगलेल्या अवस्थेत हाेते. पंचनाम्यासकट सर्व कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली. या पुरुषाचे वय हे २० ते २५ वर्षादरम्यान असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबत माहिती मिळताच संबंधित नातेवाईकांनी बाणकोट पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन उत्तम पिठे यांनी केले आहे.