साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात आंघोळ करत असताना औरंगाबादच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. वैभव मधुकर साळुंखे (२५, श्रीरामनगर, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद) असे या मृताचे नाव आहे. दिलीप रतन सोनवणे हे आपल्या नातेवाईकांसह औरंगाबादहून शनिवारी सायंकाळी नाणीज येथे नरेंद्राचार्य महाराजांच्या वाढदिवसासाठी निघाले होते. रात्रभर प्रवास झाल्याने सकाळी दाभोळे येथील काजळी नदीच्या पात्रात सर्वजण आंघोळीसाठी थांबले होते.
गाडीतून एकूण दहाजण प्रवास करत होते. यावेळी वैभव मधुकर साळुंखे हा आंघोळीसाठी काजळी नदीच्या पात्रात गेला असता पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. पाण्यातून बाहेर पडण्यासाठी व जीव वाचवण्यासाठी तो प्रयत्न करत होता. मात्र त्यात यश न आल्याने अखेर त्याच मृत्यू झाला.ही घटना सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेची खबर मिळताच सहाय्यक पोलीस फौजदार संजय उकार्डे, हेडकॉन्स्टेबल कमलाकर तळेकर, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व शव आरोग्य केंद्रात आणून शव विच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेचा अधिक तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल प्रमोद वाघाटे करत आहेत.