लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : महिलांच्या सुरक्षिततेसाठी तयार झालेल्या ‘बडीकॉप’ या कम्युनिटी पोलिसिंगचे काम रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले आहे. रत्नागिरीतील महिलांना सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्यासाठी जिल्हा पोलीस विभाग पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत झाले आहे.
महिला सुरक्षेसाठी पोलिसांचे दामिनी पथक, प्रतिसाद मोबाईल ॲप, टोल फ्री हेल्पलाईन यासारखे उपक्रम यापूर्वीच सुरू करण्यात आलेले आहेत. पोलीस स्थानक पातळीवर महिला सुरक्षा समिती, जिल्हा तसेच आयुक्तालयाच्या स्तरावर महिला साहाय्य कक्ष, समुपदेशन केंद्र, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध समन्वय कक्ष आदी कक्ष व पथके स्थापन करण्यात आली आहेत. लहान मुलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करण्यासाठी पोलीस स्थानक पातळीवर एक पोलीस अधिकारी, कर्मचारी हे बालकल्याण अधिकारी म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व सुरक्षेसाठीही पोलीस स्थानक पातळीवर नागरिक सुरक्षा समिती स्थापन करण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून आता महिला सुरक्षेसाठी ‘बडीकॉप’ची नेमणूक करण्यात आली आहे. या रचनेत जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस स्थानकाचे प्रभारी अधिकारी 'बडीकॉप'चे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांच्याअंतर्गत बडीकॉपची बीटनिहाय संरचना करण्यात आली आहे. ते 'बडीकॉप बीट' म्हणून बीट म्हणून ओळखले जाते.
शासकीय कार्यालये, निमशासकीय कार्यालये, खासगी संस्था, खासगी कार्यालये, कंपन्या आदी ठिकाणाच्या नोकरदार महिलांच्या तक्रारी, गृहिणी तसेच अन्य छोटे-मोठे काम करणाऱ्या महिला यांच्या काही तक्रारी प्राप्त झाल्यास त्यांना 'बडीकॉप' ने प्रतिसाद देणे अपेक्षित आहे. तक्रारदार महिलांना तातडीच्या मदतीसाठी प्रतिसाद देणे, त्यासाठी बडीकॉप व्हॉट्सॲप ग्रुप तयार करणे, व्हॉट्सॲप, ई-मेल अथवा फोनद्वारे तक्रारदार महिलेशी संपर्क साधणे हे ‘बडीकॉप’चे काम आहे.
हे कॉम्युनिटी पोलिसिंग रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झाले असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत आहे. ज्या महिलांना अडचणी असतील त्यांनी १०९१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महिलांची सुरक्षितता महत्त्वाचीच : डॉ. मोहित कुमार गर्ग
जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हा पोलीस कटिबद्ध आहेत. यासाठी विविध पर्याय उपलब्ध असले तरीही महिलांच्या नोकरी किवा घरातील तक्रारींना तत्काळ सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी बडीकॉप ही संकल्पना जिल्ह्यात राबविण्यास सुरुवात झाली आहे. महिलांनी न घाबरता पोलिसांवर विश्वास ठेवून त्यांच्या अडचणी आम्हाला सांगाव्या, असे आवाहन डॉ. गर्ग यांनी केले आहे.