रत्नागिरी : तालुक्यात बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याकडे पोलीस व आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत सदस्यांनी रत्नागिरी पंचायत समितीच्या सभेत बोगस डॉक्टरांचा प्रश्न उचलून धरला. कोरोना महामारीमध्ये अनेक रुग्ण या बोगस डॉक्टरांकडे उपचारासाठी जातात. मात्र, त्याची नोंद होत नसल्याने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, असा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला.
रत्नागिरी पंचायत समितीची सभा गुरुवारी ऑनलाईन पध्दतीने सभापती संजना माने यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी उपसभापती उत्तम सावंत, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, सदस्य आणि खातेप्रमुख या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी झाल्यास बी-बियाणे पुरविणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी सदस्या स्नेहा चव्हाण यांनी केली. सदस्य गजानन पाटील यांनी रत्नागिरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टर असून, या डॉक्टरांवर पोलीस तसेच आरोग्य विभाग का कारवाई करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित करून तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच इतर विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली.