दापोली : पंतप्रधान किसान सन्मान योजनेत अनेक ठिकाणी बोगस नावे आढळली आहेत. तालुक्यातील अडखळ, आंजर्ले आणि आडे या गावांतील लाभार्थ्यांच्या यादीतही परप्रांतीय लाभार्थ्यांची नावे आढळली आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, त्याचप्रमाणे पंतप्रधान कार्यालयाकडे करण्यात आली होती. त्याची दखल घेत बोगस नावे वगळण्यात आली आहेत.
पूरग्रस्तांना मदत
चिपळूण : मोरवणे बुद्रुक येथील चिपळूण बहादूरशेख खेर्डी व कळंबस्ते या परिसरात वास्तव्यास असलेल्या ३९ पूरग्रस्त ग्रामस्थांना मोरवणे बुद्रुक जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ चे मुख्याध्यापक मयाराम पाटील आणि शिक्षकांनी श्रीराम ग्रामोत्कर्ष संघ मुंबई, मौजे मोरवणे बुद्रुक यांच्या वतीने धान्य व अन्य जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
साथरोग उपाययोजना
चिपळूण : चिपळूण आणि खेडमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत पूर आल्याने अतोनात नुकसान झाले आहे. साठलेला कचरा आणि पाणी यामुळे साथरोग उद्भवण्याची शक्यता असल्याने जिल्हा हिवताप अधिकारी संतोष यादव यांनी या भागात तातडीने आरोग्य पथक पाठविले. या पथकाने कीटकनाशकफवारणी, धूरफवारणी आदी उपाययोजना राबविल्या आहेत.
क्रांतिकारकांना अभिवादन
दापोली : क्रांती दिनाचे औचित्य साधून दापोली नगरपंचायतीच्या प्रांगणात क्रांतिकारकांच्या स्मारकाला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. यावेळी माजी सभापती किशोर देसाई, नगराध्यक्षा परवीन शेख, नगरसेविका कृ.पा. घाग, शबनम मुकादम, जया साळवी, नम्रता शिगवण, स्वातंत्र्यसेनानी श्रीकृष्ण पेठे, दत्तात्रय मुरूडकर आदी उपस्थित होते.
अतिवृष्टीचा फटका
सावर्डे : २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीचा फटका चिपळूण शहराला आणि परिसराला मोठ्या प्रमाणावर बसला. यावेळी आलेल्या महापुरात ग्रामीण भागातील बांधकाम, सेंट्रिंग आदी छोट्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कामासाठी वापरले जाणारे साहित्य, मशीन पाण्यात बुडाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.