देवरुख : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणावर पाेलिसांची करडी नजर राहिली आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी येथील बाॅम्बशोधक व नाशक पथकाने श्वानपथकासह देवरुख येथील बसस्थानकाची गुरुवारी दुपारी पाहणी केली. संपूर्ण परिसर पिंजून काढून काेणतीही संशयास्पद वस्तू सापडते का, याचा शाेध घेण्यात आला.
देवरुख बसस्थानक परिसरात गुरुवारी दुपारी अचानक बाॅम्बशोधक, नाशक पथकाची गाडी येऊन उभी राहिली. त्यानंतर शोधपथकातील पोलिसांनी परिसरात तपासणीला सुरुवात केली. अचानक आलेल्या पथकामुळे परिसरातील प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला हाेता. नेमके काय झाले आहे, याची काेणालाच कल्पना मिळत नव्हती. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात हाेते.
देवरुख एस. टी. आगारप्रमुख सागर गाडे यांनी या पथकाला आगाराची पाहणी करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी एस.टी.प्रेमी नागरिक निखिल कोळवणकर व त्यांचे सहकारी उपस्थित होते. बाॅम्बशोधक, नाशक पथकाने आगार प्रमुखांची केबिन, तांत्रिक विभाग, बसस्थानकातील प्रत्येक दुकान, हाॅटेल्स या भागाची पाहणी केली. लांजा, राजापूर, रत्नागिरी या शहरातही या पथकाने पाहणी केली.
160921\img-20210916-wa0056.jpg~160921\img-20210916-wa0054.jpg
श्वान पथक~श्वान पथक