देवरुख : संगमेश्वर येथे परिसरातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी, या एकाच उद्देशाने १९२९ साली स्थापन झालेल्या व्यापारी पैसा फंड संस्थेने कलादालन सुरू केले आहे. विविध अनुभवांची माहिती देणारी रंगीत आणि सचित्र पुस्तिका ‘पैसा फंड कलादालन एक प्रवास’ याचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष किशोर पाथरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या कला विभागाने कलावर्गासमोर फायबर माध्यमात ९ फूट उंचीची पेन्सिल उभी केली आहे. याबरोबरच सहा फूट आकाराचे थ्रीडी पेंटिंग तयार केले आहे. कलादालनाकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर वारली चित्र साकारली आहेत. गॅलरीमध्ये विविध माध्यमातील दहा शिल्प असून, नामवंत चित्रकारांची ५४ चित्रे लावण्यात आली आहेत. कलादालनाची उभारणी संगमेश्वर तालुक्यातील कलारसिकांसह, पर्यटकांसाठीही असल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत या गॅलरीची संकल्पना कशी सुचली, चित्रे - शिल्पे कशी जमवली यासह विविध प्रकारची माहिती या रंगीत आणि सचित्र पुस्तिकेत देण्यात आली आहे. या पुस्तक प्रकाशन समारंभाला संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे, सचिव धनंजय शेट्ये, संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक कालिदास मांगलेकर, पर्यवेक्षक सचिनदेव खामकर, व्यापारी नितीन खातू, प्रदीप गुरव, समीर शेरे उपस्थित होते.
या पुस्तिका प्रकाशनावेळी कलादालनाच्या उभारणीसाठी विशेष मेहनत घेणारे माजी विद्यार्थी हेमंत सावंत, प्राची रहाटे तसेच ९ फूट उंचीची पेन्सिल उभी करणारा कलाकार स्नेहांकित, चित्रे जमविण्यासाठी मदत करणारा कलाकार आदित्य पराडकर यांचा प्रशालेच्या कला विभागातर्फे गौरव करण्यात आला. तसेच प्रशालेला ४ संगणक संच मिळवून देण्यासाठी सहकार्य करणारे धामणी येथील संगणक तज्ज्ञ प्रदीप गुरव यांचा संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.