रत्नागिरी : जिल्ह्यातील मच्छिमारांच्या अनेक समस्या आहेत. मच्छिमारांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा शासनाकडून नेहमीच दुर्लक्षित ठेवल्या गेल्या आहेत. या अथर्संकल्पात करण्यात आलेली तरतूद तुटपंूजी असल्यामुळे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करुनही त्या पूर्ण झालेल्या नाहीत, अशीच काहीशी स्थिती निर्माण झाली आहे. दरवर्षी राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमारांच्या सोयीसुविधांसाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात मासे उतरवण्यासाठी ४३ बंदरांवर केंद्रे आहेत. यामध्ये राजापूर तालुक्यातील साखरीनाटे, दापोली तालुक्यातील हर्णै बंदर आणि रत्नागिरीतील मिरकरवाडा ही महत्त्वाची बंदरे आहेत. मासेमारी व्यवसायातून बंदरांवर कोट्यवधी रुपयांची उलाढाल होऊन परकीय चलन मिळते. मात्र, ही बंदरे असंख्य सोयीसुविधांपासून वंचित आहेत. हर्णै आणि साखरीनाटे बंदरावर गेल्या कित्येक वर्षांपासून जेटीची मागणी करण्यात आली आहे. तर मिरकरवाडा बंदराचा दुसरा टप्पाही रखडला आहे. आजच्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पामध्ये मच्छिमारांच्या सोयीसुविधांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीही अशा प्रकारे कोट्यवधी रुपयांच्या तरतूदी करण्यात आल्या होत्या. मात्र, जिल्ह्यातील मच्छिमारी बंदरावरील सोयीसुविधा पूर्ण झालेल्या नाहीत. तरतूदीतून यंदा तरी हर्णै, साखरीनाटे या बंदरांतील जेटीचा प्रश्न सुटेल का, तसेच मच्छिमारांच्या सोयीसुविधा देण्यात येतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यात बंदरांमध्ये दैन्यावस्था आहे. अशा ठिकाणी सुविधा निर्माण झाल्यास त्यातून उलाढाल वाढेल व मच्छिमार बांधवांना त्यातून सहाय्य मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. (शहर वार्ताहर)तिन्ही बंदरातील जेटींचा प्रश्न कायम रत्नागिरी जिल्ह्यातील बंदरांवर अनेकवेळा विविध प्रकारे निधीची घोषणा केली जाते. प्रत्यक्षात दर अर्थसंकल्पात तरतूद होते. हर्णै, नाटे या बंदरातील जेटीचा प्रश्न प्रलंबित असल्याने तेथे मासे उतरण्यासाठीही पेच निर्माण होतो. मात्र, त्याबाबत अनेकवेळा प्रयत्न करूनही विकासाच्या बाबतीत अनुशेष राहतो. वर्षानुवर्षांची ही बंदरांची रडकथा थांबणार कधी, असा प्रश्न परिसरातील मच्छिमार बांधव विचारत आहेत.
बंदर विकासाला अडसर लालफितीचा
By admin | Published: March 19, 2015 9:29 PM