देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण येथे पिण्याच्या पाण्यासाठी खोदलेल्या बोअरवेलला चक्क गरम पाणी येऊ लागले आहे. हे पाणी गंधकयुक्त असल्याचा अंदाज असून, येथे कायम गरम पाणी येत राहिले तर ते पर्यटकांना आकर्षित करणारे ठरत आहे.
संगमेश्वर तालुक्यातील खडीकोळवण हे गाव कळकदरा बामणोली मार्लेश्वर या मार्गावर वसलेले आहे. श्रीक्षेत्र मार्लेश्वरला येणारे भाविक, पर्यटक आंबा घाट उतरून कळकदरा मार्गाने मार्लेश्वरला येतात. याच मार्गावर खडीकोळवण हे गाव आहे. खडीकोळवण मराठी शाळेजवळच रस्त्यालगत खोदलेल्या बोअरवेलला गरम पाणी येत आहे. मार्लेश्वरकडे जाणारे पर्यटक येथे थांबून स्नानही करतात. मात्र तेथे अजून कोणतीही व्यवस्था नाही.
गरम पाण्याच्या बोअरवेलजवळच घाट बांधून, निवारा शेड उभारल्यास ते पर्यटकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. यासाठी सरपंच संतोष घोलम यांनी पाठपुरावा सुरू केला आहे. नुकतीच घोलम यांनी संगमेश्वर पंचायत समिती सभापती जयसिंग माने यांची भेट घेऊन यासाठी काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे. माने यांनी आपण यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले आहे.
संगमेश्वर तालुक्यात आरवली व राजवाडी येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. आता खडीकोळवण येथेही असेच गंधकयुक्त गरम पाणी आढळले आहे. खडीकोळवण येथे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होत आहे.