खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील श्री समर्थ इंजिनिअर्स कंपनीच्या झालेल्या स्फोटात ६ कामगारांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत कंपनीचे व्यवस्थापक अमित प्रकाश जोशी यांच्यासह मिलिंद शिवराम बापट यांना पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता २ दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.१८ एप्रिल रोजी श्री समर्थ इंजिनिअर्स कंपनीतील रिॲक्टर प्लांटचे तापमान वाढल्याने स्फोट झाला होता. या स्फोटात मंगेश बबन जानकर (२२, रा. कासई-खेड), विलास हरिश्चंद्र कदम (३६, रा. भेलसई, खेड), सचिन तलवार (२२, रा. गुणदे, खेड) हे कामगार जागीच ठार झाले होते.
ओंकार उमेश साळवी (२३, रा. खेर्डी, चिपळूण), आनंद जानकर (२७, रा. कासई, खेड), विश्वास नारायण शिंदे (६२, रा. लोटेमाळ, खेड) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तसेच परवेज शेख (२२, रा. कासई, खेड), रामचंद्र बहुतुले (५५, रा. भेलसई, खेड), जितेश आखाडे (२३, रा. लोटे, खेड), विलास खरवते (रा. लोटेमाळ, खेड) हे कामगार जखमी झाले होते.याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक अमित प्रकाश जोशी, प्रकाश मारूती जोशी (दोघे रा. खेंड-चिपळूण), मिलिंद शिवराम बापट (रा. शिवाजीनगर, चिपळूण), प्रदीप कृष्णा पवार (लोटेमाळ) यांच्यावर हलगर्जीपणाचा ठपका ठेवत येथील पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
यातील एकास उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला आहे, तर एकास यापूर्वीच अटक करून त्याची जामिनावर सुटका झाली आहे. अमित जोशी व मिलिंद बापट यांच्यावर सोमवारी अटकेची कारवाई करण्यात आली.