रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रे अशा एकूण ९३ ठिकाणी आरटीपीसीआर तसेच ॲंटिजन चाचणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर रत्नागिरीत तीन मोबाईल टीमही कार्यरत असून आवश्यक त्या ठिकाणी जाऊन तेथील कार्यालये तसेच आस्थापनांमधील कर्मचारी यांची कोरोना चाचणी करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून काेरोना रुग्णांची संख्या भरमसाट वाढू लागली आहे. बाहेरच्या भाागातून शिमग्यासाठी आलेल्या लोकांमुळे शहराबरोबरच आता ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे लसीकरणावर भर देतानाच जिल्हा प्रशासनाकडून आता कोरोना चाचणी करण्यावरही अधिक भर देण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय, महिला रुग्णालय याचबरोबर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक रुग्णालयांमध्येही आता आरटीपीसीआर तसेच ॲन्टिजेन या दोन्हीही चाचण्या करण्यात येत आहेत. जिल्हा प्रशासनाने वाढती रुग्णसंख्या आणि वाढता संसर्ग लक्षात घेऊन लसीकरणाबरोबरच आता चाचण्यांसाठी केंद्रांची संख्या वाढवली आहे.
जिल्ह्यात आता प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण आरोग्य केंद्रे अशा एकूण ९३ केंद्रांवर सध्या कोरोनाच्या दोन्हीही चाचण्या केल्या जात आहेत. त्याचबरोबर रत्नागिरीत सध्या तीन मोबाईल टीम कार्यरत आहेत. जिल्हा रुग्णालयातही चाचणीसाठी दोन मशिन्स कार्यरत आहेत. त्यामुळे आता दिवसाला १,२०० ते १,५०० चाचण्या होऊ लागल्या आहेत. आणखी ४०० चाचण्यांसाठी नवीन मशिन्स घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी घेतला आहे.
सध्या जिल्ह्यात कोरोना चाचणी केंद्रे वाढविल्याने चाचण्या अधिक प्रमाणावर होत आहेत.
मंडणगडात पाच केंद्रे
मंडणगड तालुक्यात पंदेरी, कुंबळे, देव्हारे, चेकपोस्ट म्हाप्रळ, चेकपोस्ट लाटवण
दापोलीत नऊ
दापोली तालुक्यात फणसू, साखरोळी, पिसई, उंबर्ले, दाभोळ, आसूद, आंजर्ले, केळशी, दापोली कोविड केअर सेंटर अशा नऊ ठिकाणी चाचण्या होत आहेत.
खेडमध्ये तळे, कोरेगाव, फुरूस, आंबवली, वावे, लोटे, शिवबुद्रुक, तिसंगी, नगर परिषद दवाखाना, रेल्वे स्टेशन, कशेडी घाट ही ११ केंद्रे आहेत.
गुहागरमध्ये पाच
गुहागरमध्ये हेदवी, कोळवली, तळवली, आबलोली, चिखली या पाच ठिकाणी केंद्रे आहेत.
चिपळूणमध्ये १३ केंद्रे
चिपळूण तालुक्यात अडरे, दादर, फुरूस, कापरे, खरवते, रामपूर, सावर्डे, शिरगाव, वहाळ, इंदिरा गांधी उपकेंद्र, नगर परिषद दवाखाना, तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय ही १३ केंद्रे आहेत.
संगमेश्वरमध्ये ११
संगमेश्वर तालुक्यात साखरपा, धामापूर, सायले, फुणगूस, माखजन, कडवई, कोंडउमरे, देवळे, निवे खुर्द, बुरंबी, वांद्री या ११ केंद्रात चाचण्या होत आहेत.
रत्नागिरीत १० केंद्रे
रत्नागिरी तालुक्यात मालगुंड, कोतवडे, हातखंबा, चांदेराई, वाटद, पावस, खानू, जाकादेवी, रेल्वे स्टेशन, रत्नागिरी, मारुती मंदिर या १० केंद्रांवर चाचण्या होत असून चार मोबाईल टीम विविध ठिकाणी चाचण्या करीत आहेत.
लांजात सात
लांजा तालुक्यात साटवली, जावडे, शिपोशी, रिंगणे, वाडीलिंबू, भांबेड आणि देवधे कोविड केअर सेंटर अशा सात ठिकाणी चाचण्या होत आहेत.
राजापुरात ९ केंद्रे
राजापूर तालुक्यात कारवली, जवळेिर, कुंभवडे, फुफेरे, ओणी, धारतळे, केळवली आणि सोलगाव अशा ९ केंद्रांवर चाचण्या केल्या जात आहेत.