खेड : सेल्फी घेण्यासाठी धरणाच्या पाण्यात उतलेला पुतण्या पाय घसरुन पडला असता त्याला वाचविणाऱ्या गेलेल्या काकाचाही दुर्दैवीरित्या मृत्यू झाला. ही घटना खेड तालुक्यातील कोंडिवली धरणात काल, रविवारी (१ मे) दरम्यान घडली. इम्रान याकूब चौगूले (वय-४०) व सुहान फैजान चौगुले (१०) अशी मृत दोघांची नावे आहेत.तालुक्यातील निळीक येथील इम्रान याकूब चौगुले हे त्यांचा पुतण्या सुहान फैजान चौगुले, मुलगी लाईबा (८) व मुलगा याकुब (४) असे चौघे कोंडिवली येथील धरणावर फिरण्यासाठी गेले होते. या धरणावर त्यांचा पुतण्या मोबाईलद्वारे सेल्फी घेण्यासाठी पाण्यात उतरला. सेल्फी घेताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडू लागला. पुतण्या बुडताना पाहून त्याला वाचविण्यासाठी काका इम्रान यांनी धरणाच्या पाण्यात उडी घेतली. मात्र, यामध्ये दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला.या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ कोंडिवली धरणावर धाव घेतली. पोलिसांनी धरणात बुडालेल्या दोघांचा शोध घेण्यास सुरुवात केली. धरणात मोठ्या प्रमाणात असलेले पाणी आणि मगरींचा वावर यामुळे शोध घेण्यावर मर्यादा येत होत्या. मात्र, पोलिसांनी शोधकार्य सुरूच ठेवले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास धरणातून दोन्ही मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. रात्री उशिरा पोलिसांनी दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले.
सेल्फी काढणे जीवावर बेतले, कोंडिवली धरणात बुडून पुतण्यासह काकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 1:09 PM