अरुण आडिवरेकर ।
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीकरिता मतदारांच्या डाव्या हाताच्या तर्जनीवर शाई लावण्यासाठी महाराष्ट्रात ३ लाख शाईच्या बाटल्या लागणार आहेत. त्यांचे वाटप जिल्हाधिकाºयांना करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात निवडणुकीसाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात १९५२ मतदान केंद्र आहेत. या केंद्रांवर १३ लाख ९५ हजार ५३८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीसाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री जिल्हा प्रशासनाकडे देण्यात आली आहे. हे साहित्य कोल्हापूर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद याठिकाणाहून प्राप्त होते. जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यासाठी ५ हजार ३३९ शाईच्या बाटल्या देण्यात आल्या आहेत. केंद्रनिहाय या बाटल्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
मतदानाचा हक्क बजावल्याची खूण म्हणून सर्वसामान्य असो की, लोकप्रतिनिधी अथवा सेलिब्रिटींकडून शाई लावलेल्या डाव्या हाताची तर्जनी अभिमानाने दाखविली जाते. लोकशाही मजबूत करणारी ही काळी रेष निवडणुकांचा अविभाज्य असा घटक बनली आहे.
मतदारांच्या डाव्या तर्जनीवर शाई लावण्याकरिता निवडणूक आयोगामार्फत राज्यात सुमारे ३ लाख शाईच्या बाटल्याची मागणी नोंदविण्यात आली होती. या सर्व बाटल्या राज्याला प्राप्त झाल्या असून, सर्व जिल्हाधिकाऱ्याच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. मतदारांच्या तर्जनीवर लावण्यात येणारी आणि काही दिवस न पुसली जाणारी ही शाई म्हैसूर पेंट्स कंपनीमार्फत बनवली जाते. ही शाई मतदानानंतरही बराच काळ बोटावर असते. सहसा ही शाई लवकर बोटावरून जात नाही.
तर्जनीवर शाई
मतदान केंद्रावर मतदाराची ओळख पटविल्यानंतर त्याला प्रवेश दिला जातो. प्रत्यक्ष मतदानापूर्वीच मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावली जाते. त्यानंतर मतदाराची स्वाक्षरी किंवा अंगठा घेतला जातो.
...तर ठरू शकता अपात्र
मतदानापूर्वी पोलिंग ऑफिसर मतदाराच्या डाव्या तर्जनीवर शाई लावलेली आहे का, याची तपासणी करतात. जी व्यक्ती डाव्या तर्जनीची तपासणी करु देत नाही ते मतदानासाठी अपात्र ठरू शकतात. मतदाराला डाव्या हाताची तर्जनी नसेल तर डाव्या हातावरील कोणत्याही बोटाला शाई लावली जाते.
केंद्रावर दोन बाटल्या
जिल्ह्यातील एका मतदान केंद्रावर कमीत कमी दोन शाईच्या बाटल्या देण्यात येतात. मात्र, मतदारांची संख्या जास्त असेल तर त्या मतदान केंद्रावर तीन शाईच्या बाटल्या देण्यात येतात.