रत्नागिरी : शहरातील गजबजलेल्या बालरुग्णालयाचे रूपांतर कोविड सेंटर म्हणून होताच याबाबत त्या परिसरातील नागरिकांनी लागलीच संबंधितांना कळवूनही दखल घेण्यात आली नाही. आजूबाजूची परिस्थिती पाहता एका सामुदायिक संकुलात हे सेंटर सुरू करायला परवानगी दिली कुणी? यामध्ये नियम धाब्यावर बसवून काेविड सेंटर सुरू करणाऱ्या रुग्णालयाची मान्यता रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
परवानगी देण्यात आलेले कोविड सेंटर हे संकुलात आहे. याच रुग्णालयात जाण्यायेण्याचा जिना हा सामायिक आहे. शिवाय आजूबाजूला दाट लोकवस्ती आहे. कोविड सेंटर देताना जे निकष आहेत त्यात हे बसत नाही अशी तेथील रहिवासी असलेल्या नागरिकांची तक्रार आहे. ही तक्रार तेथील नागरिकांनी सबंधितांपुढे मांडूनही सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आल्याचे जनतेचे म्हणणे आहे. म्हणून या प्रकाराला नियम मोडून खतपाणी घालणाऱ्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा असेही समविचारीने म्हटले आहे. कोविड सेंटरची नितांत गरज आहे. म्हणून भरवस्तीत निवासी वाणिज्य संकुलनात असे सेंटर उभारणे म्हणजे इतरांचे आरोग्य धोक्यात येत असल्याने या सेंटरची मान्यता रद्द करावी वा अन्यत्र हलवावे असे समविचारीने म्हटले आहे.
तिथेच फार वर्षापर्वीचे प्रसूतिगृह आहे. परवानगी देताना किमान प्रसूती दाखल महिला, गरोदर माता, नवजात शिशू यांच्याविषयी जाणूनबुजून वा हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात आले की कसे? केवळ या एका गोष्टीमुळे हे कोविड सेंटर नाकारले जात असताना मान्यता देण्याचा अट्टाहास कुणी आणि कशापायी केला आहे, ते पुढे यावे, अशी मागणी समविचारीतर्फे माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये, राज्य सरचिटणीस संजय पुनसकर,महासचिव श्रीनिवास दळवी, रघुनंदन भडेकर,निलेश आखाडे,महिलाध्यक्ष जान्हवी कुलकर्णी, संघटक सुप्रिया सुर्वे आदींनी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडे केली आहे.