जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर या दिवसांत पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत असते. मात्र कोरोना संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनमुळे सलग दुसऱ्या वर्षी पर्यटनस्थळे शांत झाली आहेत. पर्यटकांमुळे हॉटेल्स, लॉजिंग्स व्यवसायही या हंगामात तेजीत असतो. रत्नागिरीत अन्य शहरांच्या तुलनेत महागाई सर्वाधिक असताना पर्यटकांमुळे विविध व्यवसायांना झळाळी असते. उन्हाळी सुट्टीत आलेले पर्यटक, पाहुणे तसेच नागरिकांची सायंकाळच्या वेळेत शहराबरोबर आसपासच्या समुद्रकिनाऱ्यांवर गर्दी असते. आरेवारे, काजिरभाटी, गणपतीपुळे, रत्नागिरी शहरातील मांडवी, भाट्ये किनाऱ्यांवरही पर्यटकांची उशिरापर्यंत गर्दी असते. मात्र सध्या सर्व किनारे सुने-सुने झाले आहेत. पावसाळ्यातील चार महिने पर्यटन व्यवसाय थंडच असतो. गतवर्षी दीपावलीपासून मंदिरे उघडल्यानंतर पर्यटन व्यवसाय सुरू झाला होता. जेमतेम चार महिने व्यवसाय सुरू होता. मार्चपासून पुन्हा ब्रेक लागला आहे. हॉटेल्समध्ये खाद्यपदार्थ पार्सल विक्रीला परवानगी देण्यात आली असली तरी पूर्वीप्रमाणे लोकांचा ओढा कमी झाला आहे. काही व्यावसायिकांनी होम डिलिव्हरी सुरू केली आहे. व्यवसाय बुडू नये यासाठी पार्सल सुविधा देण्यात येत असली तरी कोरोनाच्या भीतीमुळे मागणी कमी झाली आहे. विविध खासगी आस्थापनांनी कॉस्टकटिंग सुरू केल्याने कित्येकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. उद्योग - व्यवसाय बुडाले आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता देशातून कोरोना हद्दपार होण्यास काही अवधी लागणार आहे. कोरोनाचे पडसाद पर्यटनासह विविध व्यवसायांवर उमटत असल्याने त्यातून सावरायला अजून काही कालावधी जाणार आहे. केवळ सकारात्मक विचार करून चांगल्या दिवसांची प्रतीक्षा करणे हाच त्यावर उपाय आहे.
पर्यटन व्यवसायास ‘ब्रेक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 4:39 AM