चिपळूण : तालुक्यातील आकले गावी वडिलोपार्जित जमिनीच्या सात-बारावर नाव दाखल करण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना तलाठी गणेश अर्जुन सुर्वे (५०, प्रथमेश अपार्टमेंट, पाग चिपळूण) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी रंगेहाथ पकडले. यातील तक्रारदार हैद्राबाद येथील रहिवाशी आहेत. त्यांचे मूळ गाव आकले हे आहे. तेथे त्यांचे वडिलोपार्जित घर व जमीन आहे. आईचे निधन झाल्यावर त्यांचे नाव जमिनीच्या सात-बारावरून वगळण्यात आले. हे तक्रारदार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी वारस तपास होऊन त्यांचे नाव दप्तरी दाखल करण्यासाठी तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. याप्रकरणी वारस तपास होऊन तक्रारदाराचे नाव सात-बारा दप्तरी दाखल करण्यासाठी तलाठी सुर्वे याने १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय रत्नागिरी यांच्याकडे तक्रार केली होती. तलाठी सुर्वे याने १२ हजार रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून ६ हजार रुपये शनिवारी सकाळी ११.५० वाजता हॉटेल रुचीच्यासमोर स्वीकारले. त्याचवेळी सापळा रचून सुर्वे याला रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सतीश गुरव, पोलिस निरीक्षक एल. एन. सोनवणे, सहाय्यक पोलिस फौजदार गौतम कदम, हवालदार दिनेश हरचकर, हवालदार संतोष कोळेकर, संदीप ओगले, प्रदीप सुपल, पोलिस नाईक प्रवीण वीर, नंदकिशोर भागवत, पोलिस शिपाई योगेश हुंबरे यांनी केली. (प्रतिनिधी)
लाचखोर तलाठी जाळ्यात
By admin | Published: December 24, 2016 11:32 PM