चिपळूण : भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार चिपळूण शहरातील विविध ठिकाणी मतदान जनजागृती फलक लावून जनजागृती करण्यात येत आहे. शहरातील चिंचनाका, मध्यवर्ती बसस्थानक, नगर परिषद, बहादूरशेख नाका, पॉवर हाऊस, तहसील कार्यालय याठिकाणी मतदानात वाढ होणे व मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जनजागृती फलक लावण्यात आले आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने मतदान वाढण्याच्या दृष्टीकोनातून मतदान जनजागृती केली जात आहे. काही ठिकाणी फलक लावून व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविली जात आहे. लोकसभा निवडणुकीत जनतेने मतदानाचा हक्क बजवावा यासाठी ही जनजागृती सुरु आहे. शहरातील तहसीलदार आवारात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे.
भारत निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही मतदान जनजागृती स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. ‘मतदान हा माझा हक्क आहे आणि तो मी बजावणारच’, असे ब्रीदवाक्य या फलकावर लिहिण्यात आले आहे. प्रांताधिकारी कल्पना जगताप-भोसले, तहसीलदार जीवन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरु आहे. ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशीनच्या सहाय्याने मतदान कसे करावे, याबाबतचे फलक तहसील आवारात लावण्यात आले आहेत. तसेच चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात ‘मेहंदीच्या रंगाने नववधू सौंदर्य खुलवते... पक्क्या शाईची खूण देशाचे भवितव्य घडवते’ असा फलक लावण्यात आला आहे.