रत्नागिरी : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेमुळे स्वयंपाकघरातील चुलीची जागा स्वयंपाक गॅस शेगडीने घेतली. गॅसमुळे महिलांची चुलीच्या धुरापासूून होणारी घुसमट थांबली. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना सुरुवातीला घरपोच सिलिंडर दिला जात होता. मात्र, आता गॅस वितरण कंपन्यांकडून सिलिंडर घरपोच देण्यास नकार दिला जात आहे.
त्यामुळे गॅस सिलिंडर घरापर्यंत नेण्यासाठी ३०० रुपयांचा भुर्दंड सोसण्याऐवजी ग्रामीण भागातील अनेकांच्या घरात गॅस शेगड्या बाजुला ठेवून पुन्हा चुली पेटविल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.केंद्रातील मोदी सरकारने गरीब कुटुंबांच्या घरोघरी गॅस सिलिंडर पुरवठा करून चुलीच्या धुरातून महिलांची सुटका करण्यासाठी १ मे २०१६ पासून उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी लागणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठा घरपोच केला जात होता.स्वयंपाक बनवण्यासाठी ग्रामीण भागात आजही मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडाचा वापर केला जात आहे. त्यामुळे घरात धुराचे साम्राज्य निर्माण होते. त्याचा आरोग्यायवर परिणाम होतो, असा दावाही केला जातो.या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. त्यानुसार ग्रामीण भागात गॅस जोडण्या देण्यात आल्या. त्यासाठी काही अटी असून, त्याची पूर्तता अनेकांनी केली. कर्जसुविधेचाही लाभ अनेकांनी घेतला आहे. या योजनेने महिलांना दिलासा मिळाला. ज्यांना १४.२ किलोचा गॅस सिलिंडर घेणे परवडत नाही त्यांना ५ किलोचा गॅस सिलिंडरही पुरविला जात आहे.गेल्या काही दिवसांपासून या योजनेंतर्गत सिंलिंडर घरपोच मिळत नसल्याने तसेच अनेकांची सिलिंडर खरेदी करताना आर्थिक अडचण होत आहे. त्यामुळे अनेक लाभार्थीनी या योजनेकडे पाठ फिरवली असून मुबलक उपलब्ध असलेल्या जळावू लाकडाचा वापर करून पुन्हा चुली पेटविल्याचे चित्र आहे.घरपोच सिलिंडर मिळत नसल्याने तो आणण्यासाठी ३०० रुपये प्रवास खर्च करणे शक्य नाही. त्यामुळे अनेकांनी स्वयंपाक गॅस सिलिंडरकडे पाठ फिरवत पुन्हा चुलीचा पर्याय निवडल्याने या योजनेच्या यशस्वीतेवर परिणाम झाल्याची चर्चा आता ग्रामीणपासून शहरी भागात रंगली आहे.