रत्नागिरी : बहिणीला व्हिडीओ काॅल करून मी ट्रेनखाली आत्महत्या करत असल्याचे सांगून एका ३८ वर्षीय तरुणाने रेल्वे पुलावरून उडी मारून रेल्वेखाली आत्महत्या केली. ही घटना रत्नागिरी शहराजवळील टीआरपी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सुरेंद्र राजेंद्र कीर (रा. मुरुगवाडा-पेठकिल्ला राेड, रत्नागिरी) असे तरुणाचे नाव आहे.सुरेंद्रला दारूचे व्यसन होते. ताे गुरुवारी दुपारी शहराजवळील कुवारबाव येथील टीआरपीजवळ असणाऱ्या रेल्वे पुलावर गेला हाेता. तिथून त्याने बहिणीला माेबाइलवर व्हिडीओ काॅल केला आणि मी ट्रेनखाली आत्महत्या करत आहे, असे सांगून फाेन कट केला. त्यानंतर त्याने पुलावरून रेल्वे गाडीवर उडी घेत आत्महत्या केली. मृतदेहाचे अक्षरशः तुकडे झाले. या घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले.पाेलिसांना याबाबत माहिती रत्नागिरी ग्रामीण पोलिस स्थानकाचे पोलिस उपनिरीक्षक निखार्गे, हवालदार मंदार मोहिते, हवालदार रूपेश भिसे, हवालदार रोशन सुर्वे, अजय कांबळे घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत असल्याने पोलिसांना मृतदेहाचे तुकडे गोळा करावे लागले. त्यांनी या घटनेचा पंचनामा केला असून, याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पाेलिस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नाेंद करण्यात आली आहे.
बहिणीला व्हिडीओ कॉल करून भावाने संपवले जीवन, रक्षाबंधनाआधीच रत्नागिरीत घडली दुर्दैवी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 12:51 PM