पाचल : काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवारांसाठी आग्रह धरल्याने इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीकडे वरिष्ठ पातळीवर कोणती भूमिका घेणार याविषयी राजकीय वर्तुळात लक्ष लागून राहिले आहे.राजापूर - लांजा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेकडून स्थानिक उमेदवार म्हणून प्रकाश वाघधरे, पांडुरंग उपळकर, तर लांजातून दत्ता कदम यांची नावे चर्चेत आहेत. काँग्रेस पक्षाकडून राजन देसाई याचे नावे अग्रेसर आहे. मात्र, आमदार राजन साळवी यांनी या मतदारसंघात आपला जनसंपर्क वाढवला असून, आगामी निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली आहे. तसेच रत्नागिरी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रमेश कीर यांनी या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.आमदार राजन साळवी राजापूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. त्यांनी या मतदारसंघातून पोटनिवडणुकीसह दोनवेळा निवडणूक लढवली आहे. त्यांच्या अगोदर रत्नागिरीचे आप्पा साळवी यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे यावेळी स्थानिक उमेदवार मिळावा, यासाठी लांजा - राजापूर तालुक्यातून मागणी केली जात आहे. राजन साळवी यांनी मुंबईस्थित राजापूरवासीयांना डावलून तालुक्यात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यातील महत्त्वाच्या राजापूर मतदारसंघात आतापासूनच इच्छुकांची संख्या वाढत असून, काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षांत उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू आहे. सध्या निवडणुकीचे वातावरण तयार झाल्याने आता याबाबत कोण काय भूमिका घेणार, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागून राहिले आहे. शिवसेना, काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आगामी निवडणुकीसाठी स्थानिक उमेदवाराची मागणी केल्याने वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची उमेदवार निवडीच्या वेळी डोकेदुखी वाढणार आहे. स्थानिक कार्यकर्त्यांच्या मागणीबाबत वरिष्ठ कोणती भूमिका घेतात, याकडे राजापूर आणि लांजावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)
राजापुरात इच्छुकांची भाऊगर्दी
By admin | Published: July 17, 2014 11:47 PM