रत्नागिरी : ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’द्वारे भारतभर बंधुत्त्वाचा संदेश देणारे आस्ट्रेलियाचे माजी मंत्री धावपटू पॅट फार्मर यांचे रत्नागिरी शहरात जिल्हा प्रशासन, सर्व शाळा तसेच नागरिकांकडून औक्षण करून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. आस्ट्रेलियाचे माजी शिक्षण व क्रीडा विभागाचे मंत्री तसेच मॅरेथॉन धावपटू पॅट फार्मर हे भारत व आस्ट्रेलिया यांच्यातील परस्पर संबंध वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन २०१६’अंतर्गत आपल्या देशात कन्याकुमारी ते श्रीनगर एकूण ४६०० किलोमीटरची दौड करत आहेत. दौडअंतर्गत त्यांचे आज रत्नागिरी येथे आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात फार्मर यांचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी स्वागत केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सारंग कोडोलकर, तसेच अन्य अधिकारी व कर्मचारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शालेय विद्यार्थिनींनी औंक्षण करुन त्यांचे स्वागत केले. यावेळी फार्मर यांनी विद्यार्थ्यांसह सर्वांनाच उत्स्फूर्तपणे हस्तांदोलन केले. त्यांच्या पुढील दौडमध्ये विविध विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरिक, विद्यार्थी यांनी काही काळ सहभाग घेतला. आज त्यांचा गणपतीपुळे येथे मुक्काम असून ‘स्पिरीट आॅफ इंडिया रन’ १३ रोजी वेळणेश्वर (ता. गुहागर) आणि १४ रोजी वेळणेश्वर ते दापोली अशी दौड करणार आहेत. या दौडमध्ये नागरिक, शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, युवा संघटना, शासकीय कर्मचारी यांनी शक्य असेल तितक्या पल्ल्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. (प्रतिनिधी)भारत आणि आॅस्ट्रेलिया संबंध वृध्दिंगत होण्यासाठी दौड़कन्याकुमारी ते श्रीनगर एकूण ४६०० किलोमीटरची दौड़जिल्हा प्रशासनाच्यावतीने ढोल ताशांच्या गजरात स्वागत.शालेय विद्यार्थिनींकडून औंक्षण.
फार्मर यांचा दौडमधून बंधुत्त्वाचा संदेश
By admin | Published: February 12, 2016 10:28 PM