आॅनलाईन लोकमतरत्नागिरी , दि. १७ : : शहरानजीकच्या टीआरपी येथील ‘बीएसएनएल’ची केबल जाळल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. अज्ञात व्यक्तीने पेट्रोल किंवा डिझेल वापरून केबल्स जाळल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे या एक्सचेंजअंतर्गत येणाऱ्या ४०० ग्राहकांची दूरध्वनी सेवा ठप्प झाली आहे. शासकीय कार्यालये, बँका यांनाही याचा जोरदार फटका बसला असून, ही सेवा सुरळीत होण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी लागणार असल्याचे सांगण्यात आले.टीआरपीजवळील पुलावर ‘बीएसएनएल’ एक्सचेंजअंतर्गत असणारी केबल अज्ञात व्यक्तीने जाळल्याची घटना आज (सोमवार) सकाळी उघडकीस आली. पावसाचे पाणी जाण्यासाठी या पुलावरील सिमेंटच्या लाद्यांना छिद्र ठेवण्यात आली आहेत. यातून पेट्रोल किंवा डिझेल ओतून हा प्रकार करण्यात आला असावा, असा संशय ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.
यासंबंधी रविवारी रात्री १२.४५ वाजण्याच्या सुमारास ‘बीएसएनएल’कडे पहिली तक्रार करण्यात आली. त्यानंतर ग्राहकांच्या तक्रारींचे फोन खणखणू लागले. सोमवारी सकाळी हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. ग्राहकांच्या सेवेबरोबरच शासकीय कार्यालये, बँका यांनाही याचा फटका बसला. साईनगर, कुवारबाव, गयाळवाडी, रेल्वे स्टेशन, पोलीस स्थानक या परिसरातील दूरध्वनी सेवा ठप्प झाली.
हे वृत्त कळताच सोमवारी सकाळी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ‘बीएसएनएल’बरोबरच अन्य कंपन्यांच्याही केबल्स जळल्याचे निदर्शनास आले. १५ मीटर लांबीची केबल या आगीत जळून खाक झाली आहे.
आग लावण्यात आलेला परिसर तापल्याने कर्मचारी वर्गाला काम करण्यात अडथळा येत होता. कुणीतरी जाणूनबुजून हा प्रकार केल्याचे ‘बीएसएनएल’च्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या प्रकाराबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात ‘बीएसएनएल’तर्फे तक्रार नोंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)