राजापूर : माजी केंद्रीय मंत्री खासदार सुरेश प्रभू यांच्या सूचनेप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्गसाठी व्यापक आराखडा तयार करण्याचे काम बीएसएनएलचे अधिकारी करत आहेत. या आराखड्यासह प्रभू स्वत: दूरसंचार मंत्र्यांशी बैठक करणार असून, त्याची अंमलबजावणी झाल्यास रत्नागिरी व सिंधुदुर्गात निश्चित डिजिटल क्रांती होईल, असा दावा टेलिकॉम सल्लागार समितीचे सदस्य संतोष गांगण यांनी केला आहे.
कोकणात मोबाईल आणि इंटरनेटच्या खूपच गंभीर समस्या असून, संतोष गांगण यांची टेलिकॉम सल्लागार समितीवर नियुक्ती झाल्यानंतर बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांशी बैठका करून समस्यांची माहिती घेतली. त्याआधारे दिल्लीत दूरसंचार मंत्रालय स्तरावर मंत्र्यांच्या व संबंधित अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन चर्चा करून समस्या सोडविण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचे संकट असतानाही दिल्लीत जाऊन दूरसंचार मंत्रालयात पाठपुरावा सुरू ठेवला. रत्नागिरीचे तत्कालीन बीएसएनएलचे जनरल मॅनेजर श्रीकांत मब्रूखाने यांनी समस्या प्राधान्याने सोडविण्यास सुरुवात करताना रायपाटण व पाचल येथे स्वत: आपल्या सहकाऱ्यांसोबत जाऊन ग्रामस्थांकडून समस्या जाणून घेतल्या. राजापूर पूर्व विभागातील बहुतांश ठिकाणी बीएसएनलच्या समस्या असून, मोबाईल तसेच इंटरनेट सेवा नियमित नव्हती. पाचल येथे सीपॅन बी-१ व ए-१चे आधुनिक उपकरण लावण्यात आले. तसेच केळवली, कोंडये, राजापूर व पाचल अशी रिंग तयार करून पाचल येथे केंद्रीकृत वितरण सेवा उभारली गेली. त्यामुळे मोबाईल नेटवर्क व इंटरनेट सेवा नियमित सुरू झाल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. बीएसएनएलमधून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे तुटपुंज्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बीएसएनएल रत्नागिरीचे जिल्हा जनरल मॅनेजर विकास जाधव यांनी रायपाटण (ता. राजापूर), रिळ (ता. रत्नागिरी), ताम्हाणे- देवरुख या टॉवरची कामे पूर्ण केली आहेत.
रायपाटण टॉवर सुरु झाल्याने पाचल टॉवरवरील भार कमी होणार आहे. करक - कारवली येथील टॉवरचे काम अंतिम टप्प्यात असून, अगदी अल्पावधीत टेलिकॉम सेवा सुरु होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील मागील बरीच वर्षे अर्धवट असलेल्या टॉवरच्या कामालाही गती आली असून, लवकरच टेलिकॉम सेवा सुरु होईल. रत्नागिरी जिल्ह्यातील उर्वरित बांधकाम अर्धवट अवस्थेत असलेल्या बत्तीस टॉवरची कामेही आगामी काळात पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे गांगण यांनी सांगितले.