खेड : शहरवासियांवर कोणतीहि अतिरिक्त करवाढ न लादणारे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे शिल्लकी अंदाजपत्रक नगरपरिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आले.या आर्थिक वर्षात गतवर्षाची शिल्लक, विविध स्वरूपातील कर, वसुली व विविध प्रकारच्या अनुदानातून सुमारे ४८ कोटी ६५ लाख ९८ हजार ९०३ रूपयांचे उत्पन्न नगरपरिषदेला अपेक्षित असून ४५ कोटी ३० लाख ९६ हजार ७८ रुपए खर्च होण्याची शक्यता अंदाजपत्रकात मांडण्यात आली आहे. नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद सभागृहात झालेल्या अर्थसंकल्पाच्या खास सभेत सवार्नुमते अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला.अर्थसंकल्पामध्ये विविध विकास कामांसाठी भरीव तरतुद करण्यात आलेली आहे. नवीन विद्युत पोल टाकणे २० लाख, पाईपलाईन दुरुस्ती व नवीन टाकणे १ कोटी, पाणी वाहन दुरुस्ती १२ लाख, बायोगॅस प्लॅन्ट दुरस्ती व देखभाल २५ लाख, रोगप्रतिबंधक लस खरेदी दीड लाख, पुतळे बसविणे २५ लाख, नवीन बागा तयार करणे १० लाख, न.प.नागरीकांसाठी विमा ७ लाख, विकास योजना व आराखडा ६ लाख, पाणी विभाग नवीन वाहन खरेदी ५ लाख, चौदाव्या वित्त आयोग अनुदानातून करावयाचा खर्च २ कोटी ५० लाख, राज्य सरोवर संवर्धन योजनेमधील खर्च ४ कोटी, डपिंग ग्राऊंड जागा खरेदी ५ लाख, भरणे जॅकवेल पॅनल रुम बांधणे ८ लाख, दवाखाना इमारत दुरुस्ती २५ लाख ५० हजार, जिल्हास्तर नगरोत्थान अंतर्गत स्मशानभुमी देखभाल दुरुस्ती १ कोटी, सांस्कृतिक केंद्र देखभाल दुरुस्ती १ कोटी ५० लाख, स्वच्छता वाहन खरेदी १४ वा वित्त आयोग ५० लाख रुपयांची तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पातील प्रत्येक तरतुदीवर चर्चा होऊन एकमताने नवीन आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पास सवार्नुमते मान्यता देण्यात आली. या सभेसाठी शिवसेना गटनेते बाळाराम खेडेकर, शहरविकास आघाडी गटनेते अजय माने, विविध समित्यांचे सभापती सर्व सदस्य तसेच मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, प्रशासकीय अधिकारी रजनीकांत जाधव, लेखापाल हेमंत कदम, समिती लिपीक संजय आपटे, विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी सभेला उपस्थित होते.