राजापूर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सध्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू असताना काही गावांमध्ये मात्र नेटवर्क नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. राजापूर तालुक्यातील मोरोशी गावातील विद्यार्थ्यांना सध्या ऑनलाईन अभ्यासासाठी नेटवर्कच्या शोधात इतरत्र फिरावे लागत आहे. विद्यार्थ्यांची ही गैरसोय लक्षात घेऊन शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर यांनी खासदार विनायक राऊत यांना निवेदन दिले असून, मोरोशी गावात बीएसएनएलचा टॉवर उभारण्याची मागणी केली आहे.
राजापूर तालुक्यातील मोरोशी गावातील विद्यार्थ्यांना गेले वर्षभर याच समस्येचा सामना करावा लागत आहे. गावात मोबाईलला कोणत्याही कंपनीचे नेटवर्क मिळत नसल्याने गावातील मुलांना नेटवर्कच्या शोधात डोंगरावर वा अन्य ठिकाणी जावे लागत आहे. अभ्यासासाठी विद्यार्थ्यांची होणारी ही परवड मोरोशीचे उपसरपंच प्रवीण कानडे तसेच राजेश कानडे, मनोहर कानडे यांनी शिवसेनेचे संपर्कप्रमुख दिनेश जैतापकर यांच्याकडे मांडली. त्यानुसार जैतापकर यांनी खासदार विनायक राऊत यांना मोरोशी गावात बीएसएनएलचा टॉवर उभारण्याविषयीचे निवेदन दिले आहे.