अडरे : चिपळूण शहरातील मृत व्यक्तींसह कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहावर रामतीर्थ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जात आहेत. कडक उन्हाळा व पावसाळा तोंडावर आला आहे, अशा परिस्थितीत तेथे पत्र्याची शेड उभारावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष मिलिंद कापडी यांनी चिपळूण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सुरेखा खेराडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मिलिंद कापडी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चिपळूण नगर परिषदेने रामतीर्थ स्मशानभूमी व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामदेव श्री जुना कालभैरव देवस्थान ट्रस्टला दिली आहे. सद्यस्थितीत तेथील शेड काढण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत चिपळूण नगर परिषदेने या ठिकाणी त्वरित शेड उभारणे आवश्यक आहे. अन्यथा पावसाळ्यात या ठिकाणी मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणे अडचणीचे होणार आहे. तसेच लाकडाच्या पायऱ्यांचे काम करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित प्रशासनाला सूचना देण्याची मागणी त्यांनी केली आहे़