चिपळूण शहराच्या दृष्टीने उभारण्यात येणारे कोविड केअर सेंटर हे सर्व सोयी सुविधाने परिपूर्ण असणार आहे. नगर परिषदेला वैद्यकीय यंत्रणा उभी करून कोविड सेंटर चालविणे शक्य नाही. त्यामुळे नगर परिषद केवळ इमारत, पाणी व रुग्णांना जेवण अशा सुविधा पुरविण्याचा विचार झाला आहे. अपरांत हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. परंतु ही सेवा मोफत की पेड स्वरूपात असणार आहे याविषयी निर्णय होणार आहे.
सुरेखा खेराडे, नगराध्यक्षा, चिपळूण.
...........................
चिपळूण शहरातील नागरिकांना आज नगर परिषदेकडून खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. तेव्हा काहीही झाले तरी कोविड केअर सेंटर पेड स्वरूपात असता कामा नये. त्यावर नगर परिषदेने फेर विचार करावा. तसेच जे सेंटर उभारले जाणार आहे ते परिपूर्ण स्वरूपाचे असायला हवे.
- प्रभाकर चितळे, चिंचनाका, चिपळूण.
...................................
कोरोनाच्या परिस्थिती व लॉकडाऊनमुळे अनेक गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत उपचार परवडत नसल्याने अनेक जण रुग्णालयात जाणे टाळत आहेत. त्याशिवाय आता बेडही मिळत नाही. त्यामुळे नगर परिषदेने गोरगरिबांचा विचार करून मगच निर्णय घ्यावा. आज रुग्णांना मोफत उपचाराची गरज आहे.
- बाबुराव भालेकर, खेंड, चिपळूण.
....................................
चिपळूण नगर परिषदेने केवळ शहराचा नव्हे तर शहरालगतच्या गावांचाही विचार करावा. आज शेजारील गावांमधून बाजारपेठेत नोकरीनिमित्त जाणारे अनेकजण आहे. त्यामुळे असे कामगार ग्रामीण भागात राहत असले तरी बाजारपेठेत जाऊन काम करीत असल्याने त्यांची ही नगर परिषदेने जबाबदारी स्वीकारायला हवी. तसेच ही सुविधा पूर्णपणे मोफत करावी.
- सैफ सुर्वे, गोवळकोट.
चिपळूण शहरातील कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलात कोरोना केअर सेंटर उभारण्याचे नियोजन सुरू आहे.