रस्ता खचला
दापोली : तालुक्यात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ओणवसे इंगळेवाडी ते गुडघे मारुती मंदिर हा उताराचा २५० फूट रस्ता दीड फूट खचला असून, या रस्त्याला तडेही गेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. रस्ता खचल्यामुळे उंबरघर व गुडघे या गावांचा ओणवसेशी संपर्क तुटला होता.
उद्योजकांसाठी आज वेबिनार
रत्नागिरी : सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग यांच्या योजनांची माहिती देण्याकरिता वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी सी.ए.ब्रॅचतर्फे व बॅंक ऑफ इंंडिया रत्नागिरी झोनल ऑफिस यांच्या सहकार्याने दि.१७ जुलै रोजी दुपारी ४ ते सात या वेळेत वेबिनार होणार आहे. हे वेबिनार मोफत होणार आहे.
मुख्याध्यापकांची बैठक
देवरूख : येथील पंचायत समिती कार्यालयात संगमेश्वर तालुक्यातील सर्व माध्यमिक विद्यालयांच्या मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी गटशिक्षणाधिकारी एस.पी. त्रिभुवने व सर्व मुख्याध्यापक उपस्थित होते. आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबत सूचना करण्यात आल्या.
कामांचा आढावा
चिपळूण : तालुक्यातील खेर्डी जिल्हा परिषद गटाच्या सदस्या दिशा दाभोळकर यांनी गटातील ग्रामपंचायतींना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी विविध विकास कामांचा आढावा घेतला. काही ग्रामपंचायतीनी विकास कामे सुचविली. मंजूर झालेल्या विकास कामांचाही आढावा दाभोळकर यांनी घेतला. जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींचीही माहिती घेतली.
साहित्य वाटप
लांजा : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे साहित्य वाटप करण्यात आले. पुनस, साटवली, वाडीलिंबू, कुरणे, आगवे, कोलथे, कोट, उपळे, गवाणे, हर्दखळे, इसवली, झापडे कांटे, वाघणगाव, रावारी, भांबेड, माजळ, वनगुळे, पन्हळे आदी गावांमध्ये प्रत्यक्ष जाऊन साहित्य वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
गुहागर : तालुक्यातील खामशेत येथे शेतीशाळा वर्ग आयोजित करण्यात आला होता. यावेळी भातपिकाविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय हळद, भाजीपाला, झेंडू, काजू लागवड उत्कृष्ट पद्धतीने करून उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी अनुभव सांगून पिकाविषयी माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शन प्रतीक बांगर यांनी केली.
भुयारी मार्गाचे काम सुरू
खेड : तालुक्यातील भरणे येथे भुयारी मार्गाच्या उभारणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे दोन्ही बाजूंकडील पर्यायी रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरू आहे. पर्यायी मार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना वाहने हाकताना कसरत करावी लागत आहे. भुयारी मार्गाच्या कामामुळे दोन्ही बाजूकडून एकेरी मार्गाचा अवलंब सुरू आहे.
आंजर्लेत रक्तदान शिबिर
दापोली : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंजर्ले येथे एम.के. इंग्लिश स्कूलमध्ये दि.१८ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाच्या काळातील रक्ताची गरज ओळखून शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी उपसरपंच मंगेश महाडिक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
भात लागवडीची कामे अंतिम टप्प्यात
रत्नागिरी : गेले चार दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील रखडलेले भात शेतीची कामे वेगाने सुरू आहेत. पाण्याची उपलब्धता झाल्याने शेतकरी लागवडीची कामे उरकण्यात येत आहे. पावसाने काही दिवस विश्रांती घेतल्याने भात लागवडीची कामे रखडल्याने शेतकरी धास्तावले होते.