रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे आहे. या जिल्ह्याला दोन तीन वर्षे नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे. नैसर्गिक आपत्ती आपण रोखू शकत नाही, मात्र, त्यांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करू, वृक्ष लागवडीवर भर देऊन प्रदुषण कमी करण्याचा प्रयत्न करू, अशी ग्वाही रत्नागिरीचे नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवारी पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिली.एम. देवेंदर सिंह यांनी आज, शनिवारी रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. मावळते जिल्हाधिकारी डॉ. बी. एन.पाटील यांच्याकडून त्यांनी पदाची सुत्रे हाती घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत करण्यात आले. डॉ. पाटील यांची मुंबई येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळावर नियुक्ती झाल्याने त्यांच्या जागी देवेंदर सिंह यांची बदली झाली आहे.देवेंदर सिंह यांनी आयआयटी रुडकी येथून संगणक अभियांत्रिकी व नंतर एम.बी.ए केलेले आहे. रत्नागिरीत येण्याआधी ते पुणे येथील राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते. या पदापूर्वी त्यांनी अकोला आणि चंद्रपूर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व नंतर यवतमाळ व बीड येथे जिल्हाधिकारी म्हणून काम केलेले आहे.भारतीय प्रशासकीय सेवेतील २०११ च्या बॅचचे आय. ए. एस. अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत येण्यापूर्वी त्यांनी दिल्ली येथे बँकिंग क्षेत्रात सेवा बजावलेली आहे. पाच वर्षांच्या या खाजगी क्षेत्रातील बँक सेवा कालावधीत रिझर्व बँक ऑफ इंडियाशी त्यांच्या कामाचा निकटचा संबंध होता.रत्नागिरीतील विमानतळाच्या टर्मिनलचे काम मार्गी लावणार असल्याचे देवेंदर सिंह यांनी यावेळी सांगितले. तसेच रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावयाचे असून यंदा प्रथम वर्षासाठी प्रवेश सुरू करावयाचे असल्याची माहितीही त्यांनी दिली.
रत्नागिरीत पायाभूत प्रकल्प उभारणे महत्वाचे : नूतन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह
By शोभना कांबळे | Published: October 01, 2022 5:33 PM