चिपळूण : गगनाला भिडलेली महागाई आणि त्यातून सर्वसामान्य जनतेचे होणारी फरफट या साऱ्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून, २५ रोजी चिपळूण कॉंग्रेसतर्फे निषेध रॅली काढण्यात येणार आहे. वाढत्या महागाईचे प्रतीक म्हणून या आंदोलनात बैलगाडीचा वापर केला जाणार आहे.
याविषयी माजी खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले की, भाजप सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. गॅस आणि इंधन दर वाढल्याने जीवनावश्यक वस्तूचे दरही गगनाला भिडले आहेत. या महागाईत सर्वसामान्य जनता होरपळून गेली आहे. जनतेत सरकारच्या विरोधात प्रचंड संताप आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवण्यात सरकारला अपयश आले आहे. याविरोधात ठिकठिकाणी निषेध मोर्चा काढला जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या सर्व नियमांचे पालन करत हे आंदोलन होणार आहे. ५० कार्यकर्त्यांचा एक गट असे अंतर ठेवून हे आंदोलन केले जाणार असून, त्यामध्ये शेतकरी बैलगाडीसह सहभागी होणार आहेत. बाजारपेठेतील भाजी मंडईपासून मार्कंडी पेट्रोलपंपामार्गे प्रांत कार्यालय अशी रॅली काढली जाणार आहे. यावेळी शहराध्यक्ष लियाकत शाह, उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे, सोनललक्ष्मी घाग, राकेश दाते आदी उपस्थित होते.