खेड : शहरातील तांबे मोहल्ला येथील बंद घरातून सुमारे २ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल चोरणाऱ्या चोरट्याला येथील पोलिसांनी अवघ्या सहा तासात गजाआड केले. याप्रकरणी अटक केलेल्या संशयिताचे नदीम तांबे असे नाव असून तो त्याच परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शहरातील तांबे मोहल्ला येथे राहणाऱ्या उजमा नाकीब तांबे (२८) व घरातील अन्य सदस्य दावतसाठी नातेवाइकांकडे गेले होते. ही संधी साधून याच परिसरातील स्टर्लिंग इमारतीत राहणाऱ्या नदीम तांबे याने त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी उचकटून घरात प्रवेश केला. घरातील पलंगामध्ये असलेले २ लाख ४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि मोबाइल त्याने चोरून नेला.
उजमा तांबे घरी आल्यावर त्यांच्या चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी खेड पोलीस स्थानकात याबाबत तक्रार दाखल केली.
तक्रार दाखल होताच खेड पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सुजित गडदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सापळा रचून नदीम तांबे याला ताब्यात घेतले. चाेरी करताना कोणताही पुरावा मागे सोडला नसतानाही खेड पाेलिसांनी अवघ्या ६ तासातच चाेरट्याला जेरबंद केल्याची कामगिरी केली आहे.