चिपळूण : तालुक्यातील दहिवली रस्त्यावर असलेल्या आशियाना अपार्टमेंटमध्ये झालेल्या घरफोडीचा अवघ्या २४ तासात छडा लावून सावर्डे पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. मुस्तफा यासिन काद्री (२३, सावर्डे, अडरेकर मोहल्ला) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडे रोख रक्कमसह यापूर्वी झालेल्या घरफोडी मुद्देमाल देखील सापडला आहे. त्यामुळे अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.
चिपळूण तालुक्यातील दहिवली रस्त्यावर आशियाना अपार्टमेंट नावाचे गृहसंकुल असून त्यामध्ये रोशनी अडरेकर यांची सदनिका आहे. अडरेकर आपल्या कुटुंबासह मंगळवारी एका लग्न सोहळ्यासाठी गेलेले असतानाच चोरट्याने लक्ष ठेवून सदनिकेचा कुलूप तोडून घरात प्रवेश करत २५ हजार रुपये लंपास केले होते. याबाबत रोशनी अडरेकर यांनी चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. फिर्याद दाखल होताच सावर्डे पोलीस स्थानकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनीष कांबळे, सहायक पोलीस फौजदार प्रदीप गमरे, अभिषेक बेलवलकर हे या घरफोडीचा कसून तपास करत असतानाच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज व सिडीआर सारख्या तंत्रज्ञानाची मदत घेतली. त्यामुळे मुस्तफा यासीन काद्री यानेच चोरी केल्याची खात्री पोलिसांना पटली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेऊन बुधवारी सकाळी त्याच्या घराची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे ५ हजार ५०० रुपये रोख रक्कम आढळून आली. तसेच यापूर्वी दहिवली रोड येथील रहिवासी निवृत्त पोलीस अधिकारी चंद्रकांत घाग यांच्या घरातून झालेल्या चोरीतील पोलीस खात्याची तलवार, बॅटरी व अन्य साहित्य देखील आढळून आले.
तसेच घरातील कपाटात २० हुन अधिक घड्याळ व चोरीसाठी वापरण्यात येणारे कटावणी तसेच अन्य साहित्य देखील आढळून आले. पोलिसांनी या सर्व मुद्देमालासह मुस्तफा यासिन काद्री याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. सावर्डे पोलिसांनी यासंदर्भात अधिक तपास सुरू केला असून संशयिताकडे सापडलेले साहित्य पाहता यापूर्वीच्या अनेक चोऱ्या उघडकीस येण्याची श्यक्यता वर्तवण्यात येत आहे. मुस्तुफा काद्री हा चोरी करताना आजूबाजूच्या घरांना बाहेरून कडी लावत असे. अडरेकर यांच्याकडे चोरी करताना देखील त्याने हीच पद्धत वापरली होती, असेही समोर आले आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर घर बंद करून जाताना लोकांनी आपले दागिने रोख रक्कम सोबत घेऊन जावे, तसेच अपार्टमेंट व सोसायटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेची व्यवस्था करणे आवश्यक आहे. सुरक्षा रक्षकची नियुक्ती करून काळजी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक जयंत गायकवाड यांनी केले आहे.