रत्नागिरी : शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दापोलीतील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानाचे तीव्र पडसाद हळूहळू रत्नागिरी जिल्ह्यात उमटू लागले आहेत. रत्नागिरीतील शिवसैनिकांनी मंगळवारी रामदास कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारुन त्याचे दहन केले. तसेच रामदास कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.शिव संवाद यात्रेदरम्यान दापोली येथे झालेल्या जाहीर सभेत शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांनी रामदास कदम यांच्यावर जोरदार टिका केली होती. त्याचठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले रामदास कदम यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी आमदार भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टिका केली होती. याच सभेत त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरही टिका केली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर शिवसैनिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी एकत्र येत घोषणाबाजी केली. शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके यांच्या नेतृत्वाखाली तालुकाप्रमुख प्रदीप साळवी, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी रामदास कदम यांचा निषेध केला.दापोलीत जोरदार राडादापोलीत देखील रामदास कदम यांच्या पुतळा जाळण्याचा प्रयत्न झाला. यावेळी कदमांविरोधात जोरदार घोषणबाजी करण्यात आली. तेवढ्यातच आमदार योगेश कदम, रामदास कदम समर्थक शिवसेना शाखेसमोर जमले आणि दोन्ही गटात मोठा राडा झाला. उद्धव ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली.
रत्नागिरी, दापोलीत रामदास कदमांच्या प्रतिमेचे दहन, उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानाचे पडसाद उमटू लागले
By अरुण आडिवरेकर | Published: September 20, 2022 5:13 PM