दापोली (रत्नागिरी) , दि. १८ : दापोली एसटी आगारात संतप्त चालक-वाहक संपकरी कर्मचाऱ्यानी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला. सातवा वेतन आयोग लागू करावा, या प्रमुख मागणीसहीत अन्य मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्याप्रकरणी दापोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांच्याविरोधात दापोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.दापोली आगारातील एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्याना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम दापोली येथील आगारात दाखल झाले. संतप्त संपकरी कर्मचाऱ्यानी दिवाकर रावते यांचा निषेध नोंदवत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी आमदार संजय कदम उपस्थित होते.
संपकरी कर्मचाऱ्यासमवेत रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केल्यामुळे दापोली पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकांना होणारा त्रास पाहून लवकर संप मिटावा यासाठी आपण तेथे गेलो होतो , मात्र सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर दबाव टाकून आपल्यावर गुन्हा दाखल केला आहे, मात्र लोकांच्या हिताकरीता आपण असे शेकडो गुन्हे अंगावर घेवू अशी प्रतिक्रिया आमदार संजय कदम यांनी लोकमतशी बोलताना दिली .दरम्यान, एसटी कामगारांना पुकारलेला संप दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिल्याने बुधवारीही प्रवाशांचे हाल सुरु आहेत.