सचिन माेहिते देवरुख : फाेनवर बाेलत असताना अचानक आवाज बंद झाल्याने खाेलीत पाहताच वडील नसल्याचे लक्षात आले. आजूबाजूला शाेध घेतल्यानंतर वडिलांनी घराच्या मागील बाजूला आंब्याच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पाहून साऱ्यांनाच धक्का बसला. प्रकाश सदाशिव चव्हाण (५४, रा. वांझाेळे-भाेईवाडी, ता. संगमेश्वर) असे आत्महत्या करणाऱ्या सलून व्यावसायिकाचे नाव आहे. हा प्रकार रविवारी (२५ जून) राेजी रात्री घडला.
या घटनेची फिर्याद त्यांचा मुलगा मयूर प्रकाश चव्हाण याने दिली आहे. प्रकाश चव्हाण यांचा देवरूख येथे गेली १५ वर्षे सलून व्यवसाय आहे. मयूर चव्हाण सलून बंद करून घरी आला असता वडील प्रकाश चव्हाण हे रविवारी रात्री जेवत हाेते. त्यानंतर त्यांना फोन आल्याने ते जेवणावरून उठून फाेनवर बाेलत हाेते. मयूर जेवण करून बसला असता काही वेळानंतर अचानकपणे खोलीतून वडिलांच्या बोलण्याचा आवाज येत नसल्याने मयूरने दरवाजा उघडून खोलीत पाहिले. त्यावेळी ते खाेलीत दिसले नाहीत. घराच्या आजूबाजूला पाहिले असता, प्रकाश चव्हाण हे घराच्या मागील बाजूला आंब्याच्या झाडाला साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या स्थितीत दिसले.
याबाबतची माहिती कुटुंबीयांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत साडी कापून चव्हाण यांना खाली उतरवले. त्यांना तत्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. देवरूख ग्रामीण रुग्णालयात प्रकाश चव्हाण यांच्या शवाचे विच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. चव्हाण यांनी का आत्महत्या केली, याचे कारण मात्र समजू शकलेले नाही. सोमवारी चव्हाण यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.