देवरुख : काेराेनाच्या काळात एकमेकांशी हाेणारा संवादही कमी झाला आहे. नात्यातील माणसेही नात्यातील माणसांना अग्नी देण्यासाठी पुढे येत नाहीत. मात्र, अशावेळी स्वस्तिक युवा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन एका वृद्धावर अंत्यसंस्कार करून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले.
देवरुखातील मराठा कॉलनी येथील हेमंत शिंदे यांच्या चाळीतील भाडेकरूचे निधन झाले. पत्नीव्यतिरिक्त कोणीही कौटुंबिक सदस्य नसल्याने त्यांच्यासमाेर प्रश्न निर्माण झाला. याबाबत स्वस्तिक युवा प्रतिष्ठानला माहिती देण्यात आली. प्रतिष्ठानचे पदाधिकारी लागलीच कामाला लागले. हा मृतदेह नेण्यासाठी वेदपाठशाळेने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वस्तिक युवा प्रतिष्ठानतर्फे अंत्यसंस्कारानंतर श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.
या कामात स्वस्तिक युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश खामकर, नगरसेवक प्रकाश मोरे, नीलेश चव्हाण, सागर संसारे, अण्णा बेर्डे, डॉ. सुशील भालेकर, अजिंक्य नाफडे, भाऊ शिंदे, मंगेश खळे, हेमंत शिंदे यांचे सहकार्य लाभले. कुटुंबावर ओढवलेल्या दु:खद प्रसंगावेळी स्वस्तिक प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन दाखविलेल्या या माणुसकीने आजही माणसात माणुसकी असल्याचे सिद्ध झाले आहे. स्वस्तिक युवा प्रतिष्ठानने गेल्या वर्षीही सामाजिक बांधिलकी म्हणून एका वृद्धेवर अंत्यसंस्कार केले होते. प्रतिष्ठानने हाती घेतलेल्या या उपक्रमाचे काैतुक करण्यात येत आहे.