संदीप बांद्रे
चिपळूण : कोरोनाच्या परिस्थितीमुळे आधीच एसटी महामंडळ अडचणीत आलेले असताना महापुरामुळे आणखीनच तोटा झाला आहे. एकूणच एसटीचा कारभार काहीसा ठप्प झाल्याने त्यावर अवलंबून असलेले बसस्थानकाच्या आवारातील व्यावसायिक व फेरीवाले यांच्या संसाराची गाडीही थांबली होती. मात्र, आता काहीशी परिस्थिती पूर्वपदावर येत असताना संबंधितांच्या संसाराचा गाडा पुन्हा एकदा रुळावर येऊ लागला आहे.
गेली दोन वर्षे कोरोनाच्या परिस्थितीचा सामना करताना अनेक व्यवसाय व सार्वजनिक सेवा अडचणीत आल्या. साहजिकच इतर सेवांप्रमाणेच एस.टी. महामंडळालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. एसटीबरोबरच बसस्थानकाच्या आवारात असलेल्या व्यावसायिक व फेरीवाल्यांवरही त्याचा मोठा परिणाम झाला. प्रवासीसंख्या घटल्याने या व्यावसायिकांना ग्राहक मिळणे कठीण झाले. त्यामुळे कोरोनाच्या कालावधीतील संबंधित व्यावसायिक अडचणीत आले. चहाटपरी, वडापाव सेंटर व प्रत्येक बसमध्ये फिरून चणे-फुटाणे आणि अलीपाक वडी विक्री करणारे फेरीवालीही अडचणीत आले. अनेकदा लॉकडाऊन कालावधीत या व्यावसायिकांना पोटाची भूक भागवता येईल, इतकेही उत्पन्न मिळत नव्हते. बऱ्याचदा लॉकडाऊन कालावधीत अनेक एस.टी. बसफेऱ्या रद्द केल्याने बसस्थानकातील फेरीवाल्यांची व्यवसाय ठप्पच होते. त्यानंतर आता पावसाने झोडपल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील बहुतांशी बसस्थानिकांचे महापुरामुळे नुकसान झाले.
चिपळूण बसस्थानकाचे साडेतीन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचवेळी या बसस्थानकाच्या परिसरातील खोकेधारक व फेरीवाले यांचेही नुकसान झाले. मात्र आता अनलॉकनंतर एसटी बसेस धावू लागल्या आहेत. त्यामुळे बसस्थानकांवर पॉपकॉर्नसह चणे-फुटाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या संसाराची गाडीही पुन्हा रूळावर येऊ लागली आहे.
---------------------
अजूनही ८० टक्केच कारभार सुरू
लॉकडाऊन व महापुराच्या परिस्थितीत ठप्प झालेला चिपळूण एसटी आगाराचा अजूनही ८० टक्केच कारभार सुरू झाला आहे. दररोज सुमारे ८५ बस या आगारातून सोडल्या जातात. अतिवृष्टीत काही गावातील रस्ते वाहून गेल्याने त्या भागातील एसटी बससेवा बंद असली तरी उर्वरित ८० टक्के बससेवा सुरू झाली आहे.
--------------------
चार फेरीवाल्यांचा संसार अवलंबून
चिपळूण आगारात अधिकृतपणे एकूण चार फेरीवाले पॉपकॉर्नसह चणे-फुटाणे, अलीपाक, आवळा सुपारी आदींची विक्री करतात. त्यावरच त्यांच्या जीवनाचा गाडा सुरू आहे. मात्र, लॉकडाऊन कालावधीत अडचणीत आलेले फेरीवाले आता अनलॉकमध्ये पुन्हा एकदा स्थिरस्थावर होताना दिसत आहेत.
-------------------
एसटीच्या शुल्कात दरवर्षी होतेय वाढ
एस.टी. महामंडळ फेरीवाल्यांकडून दर महिन्याला शुल्क आकारले. या शुल्कात दरवर्षी वाढ होते. काही वर्षांपूर्वी ३०० ते ५०० रुपये असलेले शुल्क आता १४०० रुपयांवर पोहोचले आहे. गणेशोत्सवानंतर त्यामध्ये आणखी वाढ होऊन १६०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाणार असल्याने फेरीवाल्यांच्या पोटात आतापासूनच गोळा आला आहे.
---------------------
लॉकडाऊन कालावधीत एसटी सेवा काहीशी मंदावली होती. त्यामुळे दिवसभर फिरूनही व्यवसाय होत नव्हता. यावेळी रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रत्येक फेरीवाला अडचणीत आला होता. मात्र, आता हळूहळू परिस्थिती बदलू लागली आहे. या व्यवसायातून फार उत्पन्न मिळत नाही; पण पोटाची भूक भागेल इतके उत्पन्न नक्कीच मिळते.
- प्रकाश भालेकर, फेरीवाले, चिपळूण