रत्नागिरी : पाण्यामुळे संगणकाचे नुकसान होऊ नये, यासाठी ते काढून एका एस. टी.त चिपळूणचे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांनी साडेसात लाखाची रोकड सुरक्षित ठेवली. दहा कर्मचाऱ्यांना घेऊन एस. टी.च्या टपाचा आधार घेतला. पाण्याचा वेढा वाढल्याने साडेसात लाखाची रक्कम बरोबर घेतली. पहाटे ५ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ते टपावर अडकले होते. एन. डी. आर. एफ.च्या पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले. एस. टी.ची रक्कम तसेच सहकारी कर्मचारी यांना वाचवण्यासाठी त्यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
गेल्या बारा दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण शहराला पुराच्या पाण्याने वेढले आहे. गुरूवारी पहाटे बसस्थानकात पाणी शिरत असल्याचे आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांच्या लक्षात येताच त्यांनी रोकड विभागात धाव घेतली. साडेसात लाखाची रक्कम काढून सुरक्षित ठेवली. संगणक काढून एका एस. टी.त सुरक्षित ठेवले. मात्र, पाणी वाढत असल्याचे लक्षात येताच त्यांनी रक्कम पोटाशी गच्च धरून ठेवली. स्वत:बरोबर अन्य दहा कर्मचाऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी एस. टी.च्या टपाचा आधार घेतला.
पाणी चहूबाजूनी वाढतच होते. एस. टी. पूर्णत: पाण्याखाली गेली होती. पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी ३ वाजेपर्यंत मदतीसाठी देवाकडे प्रार्थना करीत टपावर अडकून बसले होते. अखेर दुपारी ३ वाजता एन. डी. आर. एफ.च्या पथकाने राजेशिर्के व अन्य दहा कर्मचाऱ्यांची सुटका केली. बाहेर येत असताना काही प्रमाणात रोकड पाण्यामुळे भिजली. परंतु राजेशिर्के यांच्या धाडसी निर्णयामुळे एस. टी.ची रक्कम तर वाचली आहे.