झाडी तोडण्याची मागणी
रत्नागिरी : सागरी महामार्गावरील गणपतिपुळे ते बसणी या मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झाडी वाढली आहेत. त्याचा त्रास मोठ्या वाहनांसह दुचाकीस्वारांना होत आहे. पावसाळ्यापूर्वी झाडी तोडणे आवश्यक होते. मात्र ते न झाल्याने वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
जनमित्र पदे भरण्याची मागणी
रत्नागिरी : जिल्ह्यातील जनमित्र/ लाइनमनची पदे रिक्त असून, ऊर्जा विभागातून ही पदे भरली जावीत, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. पावसामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागात ही समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. लाइनमन नसल्याने ग्रामस्थांना अंधारात राहावे लागत आहे.
साइडपट्ट्या निकामी
देवरुख : आरवली, माखजन, करजुवे रस्त्याच्या साइडपट्ट्यांवर बांध न घातल्याने पावसाळ्यात साइडपट्ट्या निकामी होऊन वाहून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. साइडपट्ट्या निकामी झाल्यास या मार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
वृक्षारोपण
साखरपा : महाराष्ट्र राज्य पर्यावरणमंत्री व युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भडकंबा, केदारलिंग मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सभापती जया माने, जि. प. सदस्या रजनी चिंगळे, उपतालुकाप्रमुख काका कोलते उपस्थित होते.