खेड : येथील आगारातील कर्मचाऱ्यांनी ८ नोव्हेंबरपासून सुरू केलेल्या संपात शुक्रवारी फूट पडली. प्रशासकीय दबावाखाली तीन कर्मचाऱ्यांनी सकाळी ११ वाजता एसटी आगारात हजेरी लावली. त्यानंतर तब्बल १८ दिवसांनी खेड आगारातून बसफेरी सोडण्यात आली.खेड आगाराच्या प्रशासनाने कामावर हजर झालेल्या तीन कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन दुपारी १२.४५ वाजता खेड ते चिपळूण ही पहिली फेरी सोडली. सद्यस्थितीत दोन चालक व एक वाहक कामावर रुजू झाले आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दोन कंत्राटी चालक व एक सेवानिवृत्तीच्या जवळ आलेला वाहक सकाळी ११ वाजता सेवेत रुजू झाले.त्यानंतर एसटी प्रशासनाने पोलीस संरक्षण घेऊन तब्बल १८ दिवसांनी दुपारी १२.४५ वाजता चिपळूण मार्गावर पहिली फेरी रवाना केली. अचानक फलाटावर लावण्यात आलेल्या या फेरीला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी शालेय विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक असे सुमारे पंचवीस प्रवासी गाडीतून मार्गस्थ झाले.
खेडमध्ये एसटी संपात फूट; १८ दिवसांनी धावली लालपरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 7:55 PM