देवरुख : देवरुख आगारातून शुक्रवारी सकाळी अचानक ग्रामीण भागातील बसफेऱ्या बंद करण्यात आल्याने कामानिमित्त देवरुखात आलेल्या प्रवाशांना पायपीट करावी लागली. आगाराच्या कारभाराबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बसफेऱ्या बंद ठेवल्या होत्या. गेल्या चार दिवसांपासून मुख्य मार्गासह ग्रामीण भागात एस.टी.च्या काही ठराविक फेऱ्या सुरू हाेत्या.
ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेल्या ६ बसफेऱ्या शुक्रवारी अचानक बंद करण्यात आल्या. या बसफेऱ्यांमध्ये कुंडी, सायले, आंगवली, बामणोली ओझरे, साखरपा मार्गे रत्नागिरी, संगमेश्वरमार्गे रत्नागिरी यांचा समावेश आहे. या बसफेऱ्या २० रोजीपर्यंत काही अपरिहार्य कारणास्तव बंद ठेवण्यात येणार असल्याचे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे या फेऱ्या बंद केल्या आहेत. सोमवारपासून बसेस सुटण्याचे वेळापत्रक पूर्ववत होईल, असे आगार व्यवस्थापक सागर गाडे यांनी सांगितले.