देवरुख : देवरुख-सांगवेमार्गे-रत्नागिरी ही बसफेरी एक वर्षानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सेवानिवृत्त एस. टी. कर्मचारी संघटना शाखा, देवरुखचे अध्यक्ष विजयराव शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी ही बसफेरी सुरू व्हावी, यासाठी आगार व्यवस्थापक सागर गाडे यांना निवेदन दिल होते.
सांडपाण्यामुळे झाले विहिरींचे पाणी दूषित
रत्नागिरी : शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील मजगाव रोडवरील स्वरूपानंदनगर येथील रहिवाशांच्या विहिरीचे पाणी सांडपाण्यामुळे खराब झाल्याचा अहवाल झाडगाव प्राथमिक आरोग्य केंद्राने दिला. देवभूमी नगरातील सांडपाणी वहाळातून थेट विहिरीजवळ जात असल्याने विहिरींचे पाणी दूषित झाले आहे.
डिंगणी चाळकेवाडी शाळेचा गैरवापर
देवरुख : विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद पडलेल्या डिंगणी चाळकेवाडी शाळा इमारतीचा गैरवापर स्थानिक ग्रामस्थांमार्फत केला जात आहे. याकडे जिल्हा परिषदेचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. शासकीय इमारत आपल्याच मालकीची असल्याच्या थाटात त्याचा गैरवापर केला जात आहे.
पाजपंढरी येथे रस्त्याचे भूमिपूजन
दापोली : तालुक्यातील पाजपंढरी येथील गोरे आळी येथे जिल्हा परिषद सदस्य मोहन मुळे यांच्या फंडातून काँक्रिट रस्ता करण्याच्या कामाचे भूमिपूजन माजी आमदार संजय कदम यांंच्याहस्ते झाले. यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते. या कामाचे भूमिपूजन करण्यात आल्याने ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
रस्त्याचे डांबरीकरण सुरू
राजापूर : तालुक्यातील तुळसुंदे येथे मच्छिमार बंदराकडे जाणाऱ्या व गेली कित्येक वर्षे खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रारंभ मच्छिमार नेते परशुराम डोर्लेकर यांच्याहस्ते करण्यात आला. आमदार राजन साळवी यांच्या शिफारशीनुसार तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने व बांधकाम सभापती महेश म्हाप यांनी या रस्त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधीची तरतूद करण्यात आली.
पंचक्रोशीत कॅन्सर रुग्ण वाढताहेत
खेड : लोटे औद्योगिक वसाहत स्थानिकांसाठी शाप की वरदान अशीच अवस्था निर्माण झाली आहे. वाढत्या वायू प्रदूषणामुळेच स्थानिक कामगारांसह पंचक्रोशीतील जनतेला श्वास घेण्यास अडथळे निर्माण होत आहेत. तर याच प्रदूषणामुळे कॅन्सर रुग्णांच्या प्रमाणात कमालीची वाढ झाली असून, आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
लसीकरण वेगाने सुरू
पावस : तालुक्यातील गोळप, पूर्णगड गावी नवीन दोन कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेने लसीकरण अधिक प्रभावीपणे राबविण्याचे नियोजन सुरू केले आहे. पावस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहायक, आरोग्य सेवक, आशा कार्यकर्त्या आदींनी कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुन्हा ही मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे.
यंदा सीमोल्लंघन होणार नाही
मंडणगड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी तालुक्यात सजरा होणारा शिमगोत्सव शांततेत होणार आहे. यंदा तालुक्यात सीमोल्लंघन होणार नाही. यासंदर्भात तहसील व पोलीस यांनी कोरोनाबाबत नियमावलीचे पालन करीत शिमगोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन तालुकावासीयांना गावभेट कार्यक्रम केले आहेत.
रस्त्याच्या कामाबाबत दिरंगाई
लांजा : तालुक्यातील रस्त्याच्या कामाबाबत होणाऱ्या दिरंगाई आणि बेजबाबदारपणाबाबत सातत्याने तक्रार करूनदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती दत्ता कदम यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुक्यातील दळणवळण रहदारीसाठी प्रमुख रस्ते नादुरुस्त झाले आहेत.