प्लास्टिक खरेदी करणे झाले अशक्य
कोकणात पाऊस मुसळधार कोसळत असतो. त्यामुळे ग्रामीण भागात पावसाळ्यासाठी लागणारे जळाऊ लाकूड, गुरांचे गवत, तसेच शेतीचे साहित्य सुरक्षित ठेवावे लागते. पूर्वीच्या काळी कौलारू घराच्या पुढे झाप लावण्यात येत असत. शिवाय गुरांच्या गोठ्यावर गवत, झापाचे आच्छादन टाकण्यात येत असे. मात्र, दरवर्षीची खर्चिक बाब लक्षात घेता प्लास्टिकच्या कापडाचे अथवा पत्र्यांचे आच्छादन टाकण्यात येत आहे. प्लास्टिक पेपर, पत्रे टिकत असल्यामुळे प्लास्टिकच्या कापडाबरोबर पत्रे, पन्हळ खरेदी करण्यात येत आहे. लॉकडाऊनमध्ये पावसाळ्यापूर्वीच्या घरे दुरुस्ती कामासाठी शासनाने परवानगी दिली असल्याने कामे ठिकठिकाणी सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध होत नसल्यामुळे गैरसोय होत आहे. ठेकेदार किंवा ओळखीच्या विक्रेत्यांकडून लागेल ते साहित्य फोनवरूनच खरेदी केले जात आहे.
शेती अवजारांची खरेदी
शेतीच्या कामांसाठी अवजारांना मागणी होत आहे. कोयती, विळे, खुरपणी, नांगराचे पाते, कुदळ, फावडी, घमेले यांची खरेदी प्राधान्याने केली जाते. ग्रामीण भागात किराणा दुकानदारांकडे शेतीची अवजारे सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शहरातील बाजारपेठ बंद असल्याने जास्त पैसे मोजून साहित्य खरेदी करावे लागत आहे. रोहिणी नक्षत्रापासून धूळवाफेच्या पेरण्या करण्यात येत असल्यामुळे शेतीच्या अवजाराबरोबर बियाणी, खतांची खरेदी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. भाजीपाल्यांची बियाणी स्थानिकस्तरावर उपलब्ध आहेत. खरेदी विक्री सोसायटीतून खतासाठी मागणी नोंदविण्यात येत आहे.
कोरोनामुळे कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी बेगमी असो व घर दुरुस्ती, शेतीची कामे त्यासाठी लागणारे साहित्य खरेदी अथवा साहित्याची जुळणी प्राधान्याने सुरू आहे.