रत्नागिरी : जिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबिरे घ्या. पण त्याचबरोबर जनतेसाठी किमान दहा तरी आरोग्य शिबिरे घ्या. तसेच सी. टी. स्कॅनची सुविधा जनतेला योग्यवेळी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी नवीन प्रस्ताव पाठवा. तो मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी, अशा सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी आज (शनिवारी) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या आढावा बैठकीत केल्या. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेण्यासाठी वायकर यांनी ही बैठक आयोजित केली होती. यावेळी आमदार राजन साळवी, जिल्हा आरोग्य समन्वय समितीचे सदस्य राजेंद्र महाडिक, जिल्हा शल्यचिकित्सक बी. डी. आरसूळकर, पंचायत समितीचे सभापती बापू म्हाप, नगरसेविका शिल्पा सुर्वे, आदी उपस्थित होते. यावेळी वायकर म्हणाले की, जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात राहणाऱ्या गोरगरीब जनतेला साथीच्या आजारांवर उत्तमप्रकारे वैद्यकीय सेवा मिळावी हे शासनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यात आरोग्य समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिबिरांचे आयोजन करून यामध्ये शासकीय, निमशासकीय संस्थांना सहभागी करुन घ्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली. नवीन डॉक्टरांच्या भरतीबाबत माहिती देताना ते म्हणाले की, याबाबत आपण लवकरच आरोग्यमंत्र्यांबरोबर चर्चा करणार आहोत. सामान्य जनतेला आरोग्याविषयक सुविधा मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात विविध संस्थांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत प्रबोधन केल्यास साथीच्या आजारांपासून होणाऱ्या रोगांवर मात करता येईल. रोग होण्यापेक्षा रोग होऊ नये, यासाठी गावागावात आरोग्य विषयक जगजागृतीची भित्तीपत्रके लावण्यात यावीत. तसेच आरोग्याच्यादृष्टीने शिबिरांमध्ये डॉक्टरांना बरोबर घेतल्यास त्यांच्या सेवेचा फायदा गरीब व गरजू लोकांना मिळेल, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. त्यासाठी जे जे आवश्यक असेल, त्याची पूर्तता करून जिल्हा रूग्णालयात आवश्यक काही सुधारणा करण्याची गरज असेल, तर त्यादृष्टीने प्रयत्न करू, असे ते म्हणाले. या बैठकीला आरोग्य अधिकारी, विविध शासकीय विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सी. टी. स्कॅनचा नवा प्रस्ताव द्या
By admin | Published: February 07, 2016 1:07 AM